Coronavirus : कवठळ येथे घरोघरी सर्वेक्षण; नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:55 PM2020-05-11T15:55:42+5:302020-05-11T15:56:04+5:30
कवठळ येथे आरोग्य विभागातर्फे नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सावंगी (जि.वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका व्यक्तीच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल १० मे रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने ११ मे रोजी जवळपास २०० कुटुंबाचे सर्वेक्षण केले. हाय रिस्क संपर्कातील सात ते आठ जण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून, कवठळ येथे आरोग्य विभागातर्फे नागरिकांची प्राथमिक तपासणी केली जात आहे.
अमरावती विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईवरून नागपूरकडे जाणाºया एका ट्रक क्लिनरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ३ मे रोजी स्पष्ट झाले होते. त्या क्लिनरच्या संपर्कातील चालकालाही कोरोनाचा संसर्ग झाला असून, सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका मधुमेही रूग्णाला अस्वस्थ वाटल्याने त्याला कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. कारंजा येथून अकोला आणि अकोला येथून वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सदर रुग्ण ८ मे रोजी उपचारार्थ दाखल झाला. १० मे रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने सतर्क होत आरोग्य विभागाची चमू १० मे रोजी कवठळ येथे दाखल झाले. ११ मे पासून घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, दुपारी २ वाजेपर्यंत २०० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. हायरिस्क संपर्कातील सात ते आठ जण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार आहेत. प्राथमिक टप्प्यात कवठळ येथील काही नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या कुटुंबातील सदस्य गावातील किती जणांच्या संपर्कात आले याची माहिती ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कवठळ गावाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत.
तीन संदिग्ध रुग्ण
रिसोड तालुक्यातील एक व कारंजा तालुक्यातील दोन असे तीन संदिग्ध रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कात कोण, कोण आले, याची माहिती घेतली जात आहे.