CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:50 PM2020-06-30T17:50:11+5:302020-06-30T17:50:21+5:30
२९ जुलैपर्यंत ४३ हजारापेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या जवळपास २७ ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून, २९ जुलैपर्यंत ४३ हजारापेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से, तामशी, निमजगा, रिसोड तालुक्यातील कन्हेरी, आसेगाव पेन, मालेगाव तालुक्यातील राजुरा, खेर्डा, भेरा यासह मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासणी मोहिमेवरून या नागरिकांची प्रकृती ठणठणीत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहितीदेखील घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे लवकरात लवकर निदान होऊन योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणू संसर्गाची ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी किंवा भागात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणी मोहिम असून, या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
सर्वांनीच आरोग्य तपासणी करून घ्यावी
मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग अधिक घातक असल्याचे दिसून येते. याबरोबरच अन्य आजार असलेल्या नागरिकांनीदेखील सतर्कता म्हणून मोहिमेदरम्यान तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.