Coronavirus : मालेगावच्या बाजारपेठेतील मुख्य रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:24 PM2020-04-24T15:24:11+5:302020-04-24T15:24:26+5:30
न नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मालेगाव शहरातील मुख्य बाजार पेठेतील रस्ते बॅरिकेटस्द्वारे २२ एप्रिलपासून बंद करण्यात आले. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी लागू असली तरी मालेगावात रस्त्यावरून विनाकारण फिरणाºयांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता नगर पंचायतच्यावतीने मुख्य बाजार पेठेतील रस्ते बॅरिकेटस्द्वारे बंद करण्यात आले. अत्यावश्यक कारणासाठी केवळ मुख्य रस्त्यावरूनच वाहतूक करावी अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा नगर पंचायत प्रशासनाने दिला. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण कुणी रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे कायद्याचे पालन करावे, कोणीही घराबाहेर पडू नये , वाहने रस्त्यावर आणु नयेत, असे आवाहन नगर पंचायतने केले.
दरम्यान, वारंवार आवाहन करूनही मॉर्निंग वॉकला जाणाºया नागरिकांची संख्या कमी होत नसल्याने शेवटी २३ एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाने कारवाईची पाऊल उचलले. २३ एप्रिल रोजी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाºया १५ जणांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी कोणीही वॉकिंग करिता बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
सर्वच ठिकाणी कारवाई व्हावी !
नगर पंचायत मार्फत मास्क न लावणे, सार्वजनिक जागेवर थुंकने, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य दुकाने उघडणे या कारणाकरीता कारवाई केल्या जात आहे. मात्र या कारवाया केवळ मुख्य बाजारपेठेत होत आहेत. या कारवाया बँक परिसरात सुद्धा होणे अपेक्षित आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीदेखील मास्क लावून व गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करीत जिल्हा कोरोनामुक्त करणे आवश्यक ठरत आहे.