CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 02:07 PM2020-03-14T14:07:08+5:302020-03-14T14:07:16+5:30
‘मास्क’ मिळतच नसून, ‘सॅनिटायझर’चाही जिल्ह्यात प्रचंड तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती वाढतच आहे. या पृष्ठभुमीवर या विषाणूपासून बचाव करण्यास आधार ठरणारे मेडिकेटेड मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात मात्र ‘मास्क’ मिळतच नसून, ‘सॅनिटायझर’चाही जिल्ह्यात प्रचंड तुटवडा असल्याचे औषधी विके्रत्यांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या वस्तूंचे उत्पादन आवश्यक प्रमाणात नसल्याने ठोक विक्रेत्यांचीही पंचाईत झाली आहे.
चीनमधून प्रसार झालेल्या ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार आता जगभरात होत असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करून सर्व विभागप्रमुखांना संनियंत्रक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. या विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमित हात धुणे, नाक, तोंड झाकून ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आदि मुख्य सुचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. यात सुरक्षेसाठी सर्वात प्रभावी मानले जाणारे ‘सॅनिटायझर आणि मेडिकेटेड मास्क’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात कोठेही मास्क मिळत नसून, ‘सॅनिटायझर’सह ‘हॅण्डवॉश’चाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. औषधींच्या दुकानात दिवसाला शेकडो ग्राहक या दोन वस्तंूची मागणी करीत आहेत; परंतु साठाच उपलब्ध नसल्याने ग्राहकांची समजूत काढताना विके्रत्यांचीही पंचाईत होत आहे.
कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिक मास्क आणि सॅनिटायझरची मागणी करीत आहेत. याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही लोक वाढीव दराने या वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही क ळले आहे. असे प्रकार नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तथापि, सर्व साधारण जनतेला मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक नसून, साबणाने नियमित स्वच्छ हात धुवून आणि स्वच्छ रुमालाने तोंड, नाक झाकूनही स्वत:चा बचाव करता येऊ शकतो.
-अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक