CoronaVirus : ‘त्या’कोरोनाबाधित रुग्णामुळे कामरगावात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:51 AM2020-04-27T10:51:17+5:302020-04-27T10:51:28+5:30
२ नागरिक व ३ शिक्षक अशा पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा / कामरगाव : अमरावती येथील रहिवासी तथा कामरगाव येथील एका शाळेत कार्यरत शिक्षक कोरोनाबाधीत असल्याचे २५ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. सदर इसमाच्या हस्ते २ एप्रिल रोजी कामरगावात शालेय पोषण आहाराचे वितरण झाले. त्यामुळे संपर्कात आलेल्या २०० जणांची २६ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली; तर २ नागरिक व ३ शिक्षक अशा पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे कामरगाव येथे मोठी खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील एर्काू शाळेत २ एप्रिल रोजी शालेय पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी संबंधित शिक्षक हजर होते. त्यांना गत आठ दिवसांपासून सर्दी, खोकला, तापेचा त्रास जाणवायला लागला. त्यामुळे अमरावती येथील रुग्णालयात तपासणी केली असता, २५ एप्रिल रोजी त्यांचा ‘कोरोना’ चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. ही वार्ता कामरगाव येथे पसरताच खळबळ उडाली. दरम्यान, कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी कालीदास तापी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, ठाणेदार सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक कपील मसके, सरपंच सुरेखा देशमुख, उपसरपंच मोसीयौदिन जहिरौदिन, पोलीस पाटील नितीन शिंगाडे आदिंनी तत्काळ गावाला भेट दिली. आरोग्य विभागाच्या चमुकडून संबंधित म्शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या २०० जणांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत; परंतु प्रत्यक्ष संपर्कात आलेले ३ शिक्षक व २ नागरिक अशा पाच जणांना दक्षता म्हणून वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पुढील १४ दिवसांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे कामरगाव येथील ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)