CoronaVirus : वाशिम जिल्ह्याला दिलासा; आयसोलेशन कक्षात एकही रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:54 AM2020-05-31T10:54:40+5:302020-05-31T10:56:24+5:30
२९ मे अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारार्थ भरती रुग्णांचा आकडा शून्य होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह नजिकच्या अकोला जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाने वाशिम जिल्ह्यावर मात्र फारसा परिणाम केलेला नाही. आजपर्यंत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला; तर सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे २९ मे अखेर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारार्थ भरती रुग्णांचा आकडा शून्य होता. तसेच १९ मे पासून एकही रुग्ण आढळला नाही. ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी ठरली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात वाशिम जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाने शासनस्तरावरून आखण्यात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा प्रकोप होऊ शकला नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या १९४ संदिग्ध रुग्णांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; तर १८० अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, आठ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला; तर सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता प्रलंबित असलेल्या सहा नमुन्यांचा अहवाल काय येतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सहा जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी रवाना!
२९ मे अखेर जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा ‘कोविड केअर सेंटर’मध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण उपचारार्थ भरती नव्हता. दरम्यान, ३० मे रोजी कोरोना विषाणू संसर्गाच्या सहा संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते अकोला येथील ‘व्हीआरडीएल लॅब’कडे तपासणीसाठी रवाना करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.
आज प्राप्त चार अहवाल ‘निगेटिव्ह’
प्रयोगशाळेकडे प्रलंबित असलेले यापुर्वीचे चार अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व ‘निगेटिव्ह’ आहेत. त्यामुळे कोरोना ‘पॉझिटिव्ह’च्या बाबतीत जिल्हा सद्यातरी निरंक आहे.
कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी अंमलात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केली जात असल्यानेच परिस्थिती नियंत्रणात आहे; मात्र धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे गाफील राहू नये.
- ह्रषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम