CoronaVirus : भोयणी, दादगाव येथील ३९० कुटुंबांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:03 AM2020-06-06T11:03:22+5:302020-06-06T11:03:40+5:30
भोयणी व दादगाव येथे घरोघरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी सुरू केली असून, ५ जूनपर्यंत ४३५ पैकी ३९० कुटुंंबाचे सर्वेक्षण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील तीन कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात ४० जण आल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून समोर आले असून, या सर्वांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, भोयणी व दादगाव येथे घरोघरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी सुरू केली असून, ५ जूनपर्यंत ४३५ पैकी ३९० कुटुंंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. दोन्ही गावात आरोग्य यंत्रणा तळ ठोकून आहे.
नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेली महिला कोरोनाबाधित असल्याचे २ जून रोजी स्पष्ट झाले. या महिलेच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात भोयणी येथे १८ तसेच कार्ली येथील तीन असे एकूण २१ जण आले आहेत. गावातील अजून नेमके किती जण आले, याची माहिती घेतली जात आहे. भोयणी येथील लोकसंख्या १४२२ असून, तेथे ३०५ कुटुंबसंख्या आहे. गत दोन दिवसात घरोघरी सर्वेक्षण करून २८० कुटुुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. अजून १४ दिवस आरोग्य तपासणी मोहिम सुरू राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. वाशिम येथील रेल्वे स्टेशन चौक परिसरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात पाच जण आले असून, या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले.
दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परतलेली ३६ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे ४ जूनला स्पष्ट झाले. या महिले्च्या हायरिस्क संपर्कात १३ जण आले असून, या सर्वांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दादगाव येथील लोकसंख्या ५६० असून, कुटुंबसंख्या १३० आहे. ११० कुटुंबाचे सर्वेक्षण केले असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जेथे रुग्ण आढळून आले, त्या भागात निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली. या दोन्ही गावात साथरोग तसेच ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळतात का याचीही चाचपणी केली जात आहे. कोणताही धोका नको म्हणून या दोन्ही गावात आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याचेही डॉ. आहेर यांनी सांगितले.
१४ दिवस आरोग्य विभागाचा राहणार वॉच
भोयणी आणि दादगाव येथे १४ दिवस आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे. येथील नागरिकांची तपासणी करण्यात आली असली तरी त्यांना तुर्तास बाहेरगावी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने या दोन्ही गावांमध्ये अतिजोखमीचे आजार असलेले रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, कर्करोग, आयएलआय अथवा 'सारी'ची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करावी. आवश्यकता असल्यास या रुग्णांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरला आणावे. या दोन्ही गावामध्ये साथीच्या आजारासंबंधी उपाययोजना सुद्धा तातडीने राबविल्या जाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिलेल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे निर्जंतुुकीकरण करणे, तसेच आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडरचा उपयोग आदी जबाबदारी संबंधित गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर सोपविण्यात आली. जून महिन्याचे स्वस्त धान्य दुकानांतील धान्यही स्वयंसेवकांमार्फत घरपोच करण्याचे नियोजन केले.