CoronaVirus :  भोयणी, दादगाव, बोराळा येथे सर्व्हे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:21 PM2020-06-09T12:21:15+5:302020-06-09T12:21:27+5:30

आरोग्य विभागाच्या चमूने या तिनही गावात घरोघरी जाऊन ८ जूनपर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले.

CoronaVirus: Survey completed at Bhoyani, Dadgaon, Borala | CoronaVirus :  भोयणी, दादगाव, बोराळा येथे सर्व्हे पूर्ण

CoronaVirus :  भोयणी, दादगाव, बोराळा येथे सर्व्हे पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामीण भागातील भोयणी (ता. मानोरा), दादगाव (ता. कारंजा) आणि बोराळा हिस्से (ता.वाशिम) येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने, आरोग्य विभागाच्या चमूने या तिनही गावात घरोघरी जाऊन ८ जूनपर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले. आतापर्यंंतच्या सर्वेक्षणात गावात अजून कुणी संदिग्ध रुग्ण आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कारंजा तालुक्यातील दादगाव येथील लोकसंख्या ५६० असून, कुटुंबसंख्या १३० आहे. १३० कुटुंबाचे सर्वेक्षण केले असून, ८ जूनपर्यंत ५६० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यापैकी कुणालाही कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. सावधगिरी म्हणून येथे अजून १० दिवस आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे.
मानोरा तालुक्यातील भोयणी येथील ३०५ कुटुंब संख्या असून, १४२२ लोकसंख्या आहे. सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. एकूण १४२२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंतच्या तपासणी मोहिमेवरून या सर्वांची ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
बोराळा हिस्से येथे २३५ कुटुंब असून, एकूण लोकसंख्या १४२८ आहे. सर्वेक्षणासाठी ६ आरोग्य चमूंची नियुक्ती केली असून, ८ जूनपर्यंत २३५ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले तसेच १४२८ नागरिकांची आरोग्य तपासणीही पूर्ण करण्यात आली. तुर्तास तरी कुणालाही कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील भोयणी, दादगाव व बोराळा हिस्से येथे आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद वाशिम

 

Web Title: CoronaVirus: Survey completed at Bhoyani, Dadgaon, Borala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.