CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:26 AM2020-06-24T11:26:43+5:302020-06-24T11:26:53+5:30
रिसोड शहरातील एक, तामशी येथील दोन अशा एकूण तीन जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल २३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड शहरातील एक, तामशी येथील दोन अशा एकूण तीन जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल २३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८३ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर ४८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ३३ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गत १० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. २३ जून रोजी एकूण ५४ अहवाल प्राप्त झाले. ५१ अहवाल निगेटिव्ह तर तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील तामसी येथील ५५ वर्षीय महिला व २५ वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले तसेच आसन गल्ली, रिसोड येथील ३८ वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवाल सुद्धा 'पॉझिटिव्ह' आला आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोनबाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८३ झाली असून, अॅक्टिव्ह रुग्ण ३३ आहेत.
सात जणांची कोरोनावर मात
२३ जून रोजी जिल्ह्यातील एकूण सात जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील १,रिसोड येथील ३, कारंजा लाड २, शेलुबाजार (ता. मंगरुळपीर) येथील १अशा ७ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८३ पैकी केवळ दोघांचा मृत्यू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
२२ जून रोजी पाठविलेल्या अहवालांपैकी दोन आणि २३ जून रोजी पाठविलेले ९० असे एकूण ९२ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. २४ व २५ जून रोजी अहवाल नेमके काय येतात याकडे लक्ष लागून आहे.