CoronaVirus : तीन संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह; १० अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:34 AM2020-05-25T10:34:26+5:302020-05-25T10:34:35+5:30
यामध्ये मालेगाव शहरातील तीन, मानोरा तालुक्यातील चार संदिग्ध रुग्णांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथील तीन संदिग्ध रुग्णांचे अहवाल २४ मे रोजी निगेटिव्ह आले असून, अजून १० संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये मालेगाव शहरातील तीन, मानोरा तालुक्यातील चार संदिग्ध रुग्णांचा समावेश आहे.
अलिकडच्या काळात परराज्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांची संख्या वाढत आहे. मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित तर एक बालक निगेटिव्ह आले होते. त्यानंतरही इतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात जिल्ह्यातील रुग्ण येत असल्याने ते संदिग्ध म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहेत. वाशिम येथील तीन जण संदिग्ध असल्याने २२ मे रोजी त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने अकोला येथे पाठविण्यात आले होते. या तिघांचेही अहवाल २४ मे रोजी निगेटिव्ह आले.
हिंगोली येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या अगदी जवळून मालेगाव येथील एक व्यक्ती संपर्कात आला. या व्यक्तीला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याशिवाय या इसमाच्या संपर्कातील अन्य दोघांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले आहेत. या तीन नमुन्याचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. याशिवाय मानोरा तालुक्यातील यशवंत नगर येथील २५ वर्षीय चालक हा मुबंई येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील एका व्यक्तीला घेऊन आल्याने त्याच्यासह एकूण चार नागरिकांना २१ मे रोजी होम क्वारंटीन केले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचे अहवाल प्रलंबित आहेत.
वाशिम येथील तीन संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मालेगाव येथील तीन आणि मानोरा येथील चार यासह अन्य ठिकाणचे तीन असे एकूण दहा अहवाल प्रलंबित आहेत.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम