CoronaVirus : ‘थ्रोट स्वॅब’चे अहवाल मिळण्यास विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:05 AM2020-05-27T11:05:34+5:302020-05-27T11:05:41+5:30
तीन जिल्हे मिळून अकोला येथे एकमेव ‘व्हीआरडीएल लॅब’ असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीने ‘रेड झोन’ जिल्हे, महानगरे आणि परराज्यातील ६६ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार २५ मे पर्यंत जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांमध्ये सदी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आढळत असल्याने ‘थ्रोट स्वॅब’ घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र तीन जिल्हे मिळून अकोला येथे एकमेव ‘व्हीआरडीएल लॅब’ असल्याने अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागत आहे. परिणामी, संदिग्ध रुग्ण, रुग्णालयीन कर्मचारी व गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागत आहे.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे (थ्रोट स्वॅब) नमुने तपासण्यासाठी अकोला येथे प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. दरम्यान, बुलडाणा येथे आजमितीस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ असून अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा तब्बल ४२८ वर पोहचला आहे. याच जिल्ह्यातून संदिग्ध रुग्णांच्या ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीचे दैनंदिन प्रमाणही कितीतरी पटीने अधिक आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यातून पाठविल्या जाणारे घशातील स्त्रावांचे नमुने ‘पॉझिटिव्ह‘ की ‘निगेटिव्ह’, हे कळण्यासाठी ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. यादरम्यान जिल्ह्यातील ‘कोव्हीड केअर सेंटर’ किंवा वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या संदिग्ध रुग्णासोबतच त्याच्यावर उपचार करणारे रुग्णालयातील कर्मचारी, गावकरी आणि संपर्कात आलेल्या सर्वांचाच जीव टांगणीला लागत आहे. ही बाब लक्षात घेता अकोला येथील प्रयोगशाळेत ‘स्वॅब’ नमुने तपासणीची गती वाढवून अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
२३ मे रोजी पाठविलेल्या घशातील स्त्रावांचे अहवाल अद्याप प्रलंबित
प्रयोगशाळेकडे पाठविल्या जाणाºया घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचे अहवाल नियमानुसार २४ तासांत प्राप्त होणे बंधनकारक आहे; मात्र हे अहवाल ९० तासानंतरही प्राप्त होत नसल्याची बिकट स्थिती उद्भवली आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून २३ मे रोजी पाठविलेल्या ८ नमुन्यांचे अहवाल २६ मे पर्यंतही प्राप्त झालेले नव्हते.
प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणाºया घशातील स्त्रावाच्या नमुन्यांचा अहवाल साधारणत: २४ तासात प्राप्त होणे आवश्यक आहे; मात्र चार ते पाच दिवस अहवाल प्राप्त होत नाही. तीन जिल्ह्यांसाठी अकोला येथेच एकमेव प्रयोगशाळा असल्याने तथा अकोल्यात अधिक रुग्ण असल्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे. यामुळे मात्र वाशिमची आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम