CoronaVirus in Washim : आणखी ११ कोरोनाबाधित; रुग्णसंख्या १४१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:02 AM2020-07-08T11:02:33+5:302020-07-08T11:02:44+5:30
आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ७ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे. यापैकी ४१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. जून महिन्यापासून वाढत असलेली रुग्णसंख्या जुलै महिन्यातही वाढतच असल्याचे प्राप्त अहवालावरून दिसून येते. ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान २६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १५ अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित ११ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील ९ व मंगरूळपीरमधील २ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील १८ वर्षीय युवक, ११ वर्षीय मुलगा, २०, ३० व ३८ वर्षीय महिला, १४ व १६ वर्षीय युवती, तसेच गंगू प्लॉट परिसरातील ३५ व ४४ वर्षीय व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगरूळपीर येथील संभाजी नगर परिसरातील ३४ वर्षीय व्यक्ती व मदार तकिया, माळीपुरा परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १४१ झाली असून, यामध्ये ४१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. १४१ रुग्णांमध्ये जिल्ह्यातील १२६, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३३ तर जिल्ह्याबाहेर आठ अशा एकूण ४१ जणांवर उपचार सुरू आहेत.
१५० जणांच्या अहवालाकडे लक्ष
जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. विशेषत: वाशिम शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जवळपास १५० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल ८ व ९ जुलै रोजी प्राप्त होईल, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. या अहवालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.