CoronaVirus in Washim : १६ निगेटिव्ह, सात जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 04:20 PM2020-07-01T16:20:47+5:302020-07-01T16:20:52+5:30
३० जून रोजी प्राप्त १६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ३० जून रोजी प्राप्त १६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून, सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, ६५ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने थोडीफार धाकधूकही कायम आहे.
परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्हयात जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे आशादायी चित्र दिसून येते. जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधित रुग्ण असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर ७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरीत २० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. २८ व २९ जून रोजी जवळपास ८१ स्वॅब पाठविण्यात आले होते. ३० जून रोजी १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ६५ जणांच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, ३० जून रोजीदेखील सात जणांनी कोरोनावर मात केली असून, आता २० जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने वाशिम व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासणी मोहिम २१ जूनपासून सुरू केलेली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जावून घरात असलेल्या संपूर्ण कुटुंबाची नोंद करुन तपासणी केल्या जात असून नागरिकांचे टेम्परेझर, प्लस यासह आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. शरीराचे तापमान जास्त आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधल्या जात आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी)