CoronaVirus in Washim : ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील २४० जण ‘क्वारंटीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:23 AM2020-05-09T10:23:15+5:302020-05-09T10:46:15+5:30
या सर्वांची आरोग्य विभागाने ८ मे पासून तपासणी सुरू केली असून, तपासणीनंतर ‘होम क्वारंटीन’ केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील एक मधूमेही रुग्ण कारंजातील एका खासगी रुग्णालयात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेला. या रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ६ मे रोजी अहवालावरून स्पष्ट झाले. या रुग्णाची तपासणी करणाऱ्या कारंजातील ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कात कारंजासह मानोरा व मंगरूळपीर तालुक्यातील जवळपास २४० जण आल्याची प्राथमिक माहिती असून, या सर्वांची आरोग्य विभागाने ८ मे पासून तपासणी सुरू केली असून, तपासणीनंतर ‘होम क्वारंटीन’ केले जात आहे.
नेर तालुक्यातील एक मधूमेही रुग्ण कारंजातील एका खासगी रुग्णालयात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेला. या रूग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा आहवाल ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान प्राप्त झाल्यामुळे कारंजातील त्या डॉक्टरसह ९ व्यक्ती व कोरोनाबाधित रुग्णाचे कारंजातील ४ नातेवाईक अशा एकूण १३ जणांना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तपासणीअंती ९ मे रोजी या १३ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कारंजातील त्या खासगी डॉक्टरच्या संपर्कातील जवळपास २४० जण आल्याची प्राथमिक माहिती महसूल व नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाली असून, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता कारंजा उपजिल्हा रुग्णालयात या नागरिकांची आरोग्य तपासणी ८ मे पासून सुरू करण्यात आली. तपासणीनंतर या सर्वांना होम क्वारंटीन केले जात आहे. होम क्वारंटीनच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला. २४० जणांमध्ये कारंजा शहर व ग्रामीण तसेच मानोरा व मंगरूळपीर तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. या २४० जणांना तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशाने कारंजा नगर परिषदेकडून प्राथमिक आरोग्य तपासणीच्या नोटीस देण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील नोटीस तलाठी मार्फत देण्यात आल्या. दोन्ही तालुक्यातील रुग्णांची माहिती मंगरूळपीर व मानोरा तहसीलदारांनादेखील देण्यात आली. ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कात अजून किती जण आले आहेत, याची माहिती महसूल व आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे.
नेर तालुक्यातील एक रुग्ण कारंजा येथील एका खासगी दवाखान्यात ४ मे रोजी नियमित तपासणी करून गेल्यानंतर, संबंधित रुग्ण हा कोरोनाबाधित असल्याचे ६ मे रोजी स्पष्ट झाले. सावधगिरी म्हणून त्या खासगी डॉक्टरच्या संपर्कात किती जण आले याची माहिती संकलीत केली जात आहे. प्राथमिक टप्प्यात एकूण २४० जण संपर्कात आल्याची माहिती असून, त्यांची आरोग्य तपासणी व होम क्वारंटीन केले जात आहे. नेर तालुक्यातून ज्या चेकपोस्ट मार्गे संबंधित रूग्ण आला, त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास त्या कर्मचाऱ्यांविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.
- धीरज मांजरे, तहसिलदार कारंजा
त्या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची प्राथमिक तपासणी सुरू असून ज्या रुग्णांना काही प्रमाणात लक्षणे आढळल्यास त्यांना कारंजातील सरकारी इमारतीमध्ये क्वारंटीन केले जात आहे. ज्यांना काही लक्षण नाही अशांना घरातच स्वतंत्र राहण्याच्या सूचना दिल्या. या मधील काही रुग्णाचे रक्त नमुने घेण्याची प्रकिया सुरू करण्यात येईल.
- डॉ. उत्तम तपासे वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय