CoronaVirus in Washim : आणखी २५ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३९१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 11:20 AM2020-07-21T11:20:51+5:302020-07-21T11:21:04+5:30
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९१ चा आकडा गाठल्याचे चित्र असून यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
वाशिम : जिल्ह्यात अवघ्या दोन दिवसांत तब्बल २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९१ चा आकडा गाठल्याचे चित्र असून यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री उशिरा ३६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. रिसोड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १ व अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील १ व पठाणपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी, रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये १७ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. यामध्ये मांगवाडी, रिसोड येथील १०, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील ३, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १, कारंजा लाड शहरातील दिल्ली वेस परिसरातील १ व नगरपरिषद परिसरातील १ आणि वाशिम शहरातील ध्रुव चौक परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.
३६ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवारी उपचार घेणाºया ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मालेगाव शहरातील ४, मंगरूळपीर शहरातील ११, कारंजा लाड येथील १० व हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.
१३० अहवालांकडे लक्ष
यापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. १९ व २० जुलै रोजी जवळपास १३० जणांचे स्वॅब घेण्यात आले. याचा अहवाल प्रतिक्षेत आहे. या नमुन्यांचा अहवाल नेमका काय येतो, याकडे लक्ष लागून आहे.
१८७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यातील १७९ आणि जिल्हयाबाहेर ८ अशा एकूण १७० कोरोनाबाधित रुग्णांवर कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.