CoronaVirus in Washim : आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १२ वर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:21 AM2020-06-07T11:21:00+5:302020-06-07T11:21:14+5:30
बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे ६ जून रोजी सायंकाळी स्पष्ट झाल्याने आता रुग्णसंख्या १२ वर पोहचली. आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे ६ जून रोजी सायंकाळी स्पष्ट झाल्याने आता रुग्णसंख्या १२ वर पोहचली. आहे. यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत चार जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील भोयणी, दादगाव येथील प्रत्येकी एक अशा दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील ३९ सह ६१ संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविले होते. यापैकी ५६ अहवाल ६ जून रोजी निगेटिव्ह आले. यामध्ये भोयणी व कार्ली येथील अहवालांचा समावेश आहे. दुसरीकडे अजून २७ अहवाल प्रलंबित असल्याने थोडी धाकधूकही कायम आहे.
बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने पाच दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचा थ्रोट स्वॅब अहवाल ६ जून रोजी पॉझिटिव्ह आल्याने, त्याच्या कुटुंबातील चार जणांना ‘क्वारंटीन’ करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली. दरम्यान, नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात भोयणी येथे १८ तसेच कार्ली येथील तीन असे एकूण २१ जण आले होते. या सर्वांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल ६ जून रोजी निगेटिव्ह आला.
बोराळा हिस्से गाव सील
बोराळा हिस्से ता. वाशिम येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने ६ जून रोजी सायंकाळी तालुका प्रशासनाची चमू दाखल झाली असून, गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली. हा रुग्ण नेमका कुठून आला किंवा कुणाच्या संपर्कात आला होता, याची माहिती आरोग्य विभाग व वाशिम तालुका प्रशासन घेत आहे.
६ जून रोजी सुरूवातीला ५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर सायंकाळी बोराळा हिस्से येथील एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या युवकाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटीन केले. हा युवक नेमका कुठून आला, कोणत्या रुग्णाच्या संपर्कात आला होता का याची माहिती घेतली जात आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम