CoronaVirus in Washim : आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:25 AM2020-06-26T11:25:55+5:302020-06-26T11:26:25+5:30
एका जणाचा कोरोना चाचणीचा अहवाल २५ जून रोजी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८६ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरातील स्वराज्य कॉलनी, डाळिंबी विहीर परिसरातील एका जणाचा कोरोना चाचणीचा अहवाल २५ जून रोजी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८६ झाली. यापैकी दोघांचा मृत्यू तर ५८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत २६ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मे महिन्याच्या अखेरपासून परजिल्हा, परराज्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात दाखल झाले. बाहेरगावावरून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होत असल्याचे रुग्णसंख्येवरून दिसून येते. २५ जून रोजी दुपारपर्यंत २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक जण पॉझिटिव्ह तर २२ जण निगेटिव्ह आले. वाशिम शहरातील स्वराज्य कॉलनी, डाळिंबी विहीर परिसरातील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, हा व्यक्ती लाखाळा परिसरातील कोरोनाबाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. दरम्यान, २५ जून रोजी हिवरा रोहिला १ व कारंजा येथील पाच अशा सहा जणांनी कोरोनावर मात केली. (प्रतिनिधी)
५८ जणांना रुग्णालयातून सुटी
४२५ जून रोजी हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील एक आणि कारंजा शहरातील पाच आ एकूण सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे.
४आतापर्यंत एकूण ५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८६ पैकी केवळ दोघांचा मृत्यू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
११०३ पैकी ९८९ अहवाल निगेटिव्ह
११०३ पैकी ९८९ अहवाल निगेटिव्ह तर ८४ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. ३० अहवालाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्याबाहेरच्या ठिकाणी पॉझिटिव्ह अहवाल निघालेले; तथापि, जिल्ह्यात उपचार घेतलेले दोन रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८६ अशी आहे. ३० अहवाल काय येतात, याकडे लक्ष लागून आहे.
२५ जून रोजी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू आहे. गुरूवारी एकूण सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक,
जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम