CoronaVirus in Washim : आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:34 PM2020-06-27T12:34:57+5:302020-06-27T12:35:36+5:30
आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८७ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा लाड तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलाचा कोरोना चाचणी अहवाल २६ जून रोजी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८७ झाली. यापैकी दोघांचा मृत्यू तर ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत २० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
मे महिन्याच्या अखेरपासून परजिल्हा, परराज्यातून मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात दाखल झाले. बाहेरगावावरून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे रुग्णसंख्येवरून दिसून येते. २६ जून रोजी दुपारपर्यंत २४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये कारंजा तालुक्यातील किनखेड येथील एका १४ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर मुलाचे कुटूंब मुंबई येथून परत असून, त्याच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, कारंजा तालुक्यातील किनखेड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कारंजा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ वर पोहोचली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या माहितीचे संकलन सुरू केले असून, सदर परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर करून गावातील सर्व नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोग्य विभागाला अद्यापही संदीग्ध असलेल्या ६६ व्यक्तींच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.
६५ अहवाल प्रतिक्षेत
जिल्ह्यात २६ जूनपर्यंत ११६२ थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८७ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात बाहेरगावी तपासणी केलेल्या; परंतु जिलह्यात उपचार करण्यात आलेल्या दोघांचा समावेश आहे, तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना १० दिवस विलगीकरणात ठेवून सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत रुग्णालयात २० जण विलगीकरणात उपचाराखाली असून, ६५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.