CoronaVirus in Washim : आणखी सहाकोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १२४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:26 AM2020-07-06T11:26:23+5:302020-07-06T11:26:30+5:30
आता एकूण रुग्णसंख्या १२४ झाली असून, यापैकी ३७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
वाशिम : शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ५ जुलैला भापूर (ता.रिसोड) येथील एक महिला पॉझिटिव्ह निघाली. वाशिम शहरातील एक जण अकोला येथे पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या १२४ झाली असून, यापैकी ३७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. जून महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर होती. १ जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शतक ओलांडले. जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. शनिवार, ४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 'आयएलआय'ची लक्षणे असलेले मालेगाव येथील २६ व ३४ वर्षीय पुरुष, नागपूर येथे कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील मंगरुळपीर येथील २९ वर्षीय पुरुष आणि औरंगाबाद येथून हराळ (ता. रिसोड) येथे परतलेल्या २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. वाशिम शहरातील हकीम अली नगर येथील एक व्यक्ती अकोला येथे कोरोनाबाधित आढळून आला. ५ जुलैला रात्री ९ वाजता प्राप्त अहवालानुसार भापूर (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२४ झाली असून, यामध्ये ३७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. १२४ रुग्णांमध्ये जिल्ह्यातील ११०, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात २८ तर जिल्ह्याबाहेर आठ अशा एकूण ३७ जणांवर उपचार सुरू आहेत. ५ जुलै रोजी वाशिम येथील एका रुग्णाने कोरोनावर मात केली. आतापर्यंत ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मंगरूळपीरकरांची चिंता वाढली
जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालावरून मंगरूळपीर शहरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. सदर व्यक्ती ही डॉक्टर असून बाधित व्यक्तींच्या संपर्कात अजून कोणते रुग्ण व नागरिक आले, याचा शोध प्रशासन घेत आहे. आता शहरात कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. डॉक्टरांच्या संपर्कात किती जण आले याची निश्चित माहिती ६ जुलैपर्यंत प्रशासनाच्या हाती येणार आहे.
४ जुलै रोजी रात्री उशिरा चार जण पॉझिटिव्ह तर ५ जुलै रोजी वाशिम शहरातील एक जण अकोला येथे पॉझिटिव्ह आला आहे. ५ जुलै रोजी वाशिम शहरातील एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला सुटी देण्यात आली आहे. उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरू आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक