CoronaVirus in Washim : बाहेरगावावरून परतलेल्यांमुळे वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:46 AM2020-06-13T10:46:59+5:302020-06-13T10:47:06+5:30
रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढत असल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते.
वाशिम : विविध कामे तसेच रोजगारानिमित्त परराज्य, परजिल्ह्यात गेलेले नागरीक जिल्ह्यात परतत असून, यापैकी रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढत असल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. १२ जून रोजी तब्बल १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४२ वर पोहचले आहे. यापैकी ३४ रुग्ण अॅक्टिव्ह आहे. विशेषत: मुंबई भागातून येणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. या पृष्ठभूमीवर प्रत्येक नागरिकाने आता स्वत:बरोबरच इतरांचे आरोग्य जपण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे
मुंबईवरून मालेगावला परतत असताना, एक महिला कोरोनाबाधित असल्याचे १५ मे महिन्यात स्पष्ट झाले होते. बाहेरगावावरून आलेल्या महिलेमुळे जिल्ह्यात सर्वप्रथम १५ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर या महिलेसोबतच प्रवासात असलेले पाच जण कोरोनाबाधित असल्याचे १९ मे रोजी स्पष्ट झाले होते. यापैकी एकाचा मृत्यू तर पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेली ६० वर्षीय महिला तसेच मध्यप्रदेशातून वाशिम येथील रेल्वे स्टेशन चौक परिसरात परतलेल्या युवती, नवी दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परतलेली महिला पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर अमरावती येथे कामानिमित्त गेलेला आणि परत बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील आलेला युवक कोरोनाबाधित निघाला. मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षीय बालक, मुंबई येथून मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव, शेलुबाजार येथे परतलेला एक जणही कोरोनाबाधित निघाला. एकंदरित बाहेरगावावरून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.
रिसोड शहरातील ‘तो’ एरिया सील
रिसोड शहरातील एकता नगरात परतलेला ४१ वर्षीय इसम हा दिल्ली येथून आला होता. त्याच्या संपर्कात कुटुंंबातील सदस्याव्यतिरिक्त अन्य कुणी आले नाही, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
४एकता नगर परिसर सील करण्याची कार्यवाही पोलीस व आरोग्य विभागाने शुक्रवारी केली.
आतापर्यंत रिसोड तालुक्याचा अपवाद वगळता वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा व मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. १२ जून रोजी रिसोड शहर व तालुक्यातील कन्हेरी या गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर वाघ यांनी सांगितले.