CoronaVirus in Washim : जिल्ह्यात परतणाऱ्यांनी वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:59 AM2020-06-08T10:59:51+5:302020-06-08T11:00:25+5:30
परजिल्ह्यातून येणाऱ्यांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परजिल्ह्यातून बोराळा हिस्से (ता.वाशिम), भोयणी (ता.मानोरा) व दादगाव (ता.कारंजा) येथे आलेली प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. अर्थात परजिल्ह्यातून येणाऱ्यांमुळेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या तिन्ही गावांतील १६०० जणांची तपासणी रविवारपर्यंत करण्यात आली. त्यातच बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात तब्बल ५१ जण असून यामध्ये वाशिम येथील एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टर व चार कर्मचारी आल्याने शहरातील खासगी डॉक्टरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवक हा कोरोनाबाधित असल्याचे ६ जूनला सायंकाळी स्पष्ट झाले. हा युवक यापूर्वी अमरावती येथून एकदा जाऊन आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या युवकाच्या संपर्कात वाशिम येथील एका खासगी दवाखान्यात चार डॉक्टर व चार कर्मचाºयांसह कुटुुंबातील २० आणि गाव परिसरात २३ जण आल्याची माहिती आहे. या सर्वांना ‘क्वारंटीन’ केले असून, ७ जून रोजी जवळपास २० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले.
३६६ पैकी ३३७ अहवाल निगेटिव्ह
४आतापर्यंत जिल्ह्यातील ३६६ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३३७ अहवाल निगेटिव्ह आले. ७ जून रोजी २३ अहवाल निगेटिव्ह आले असून, यामध्ये दादगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचाही समावेश असल्याने दादगाववासियांना दिलासा मिळाला.
४११ अहवाल पॉझिटिव्ह असून, यापैकी दोघांचा मृत्यू, सहा जणांना डिस्चार्ज तर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशातून वाशिम येथे आलेल्या युवतीचा अहवाल मध्यप्रदेशात गणण्यात आला. परंतू, तिच्यावर वाशिम येथे उपचार सुरू असल्याने एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार आहे.
४१८ अहवाल प्रतिक्षेत आहेत.
मानोरा तालुक्यातील भोयणी, कारंजा तालुक्यातील दादगाव आणि वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से ही तिनही गावे सील केली असून, आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण व तपासणी सुरू आहे. बोराळा हिस्से येथील रुग्णाच्या संपर्कात जवळपास ५१ जण आले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जात आहेत. दादगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
- डॉ.अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम