CoronaVirus in Washim : ‘होम क्वारंटीन’ करण्यावरून उद्भवताहेत वाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:50 AM2020-05-23T11:50:50+5:302020-05-23T11:51:24+5:30
आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही. मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : परराज्यातून किंवा रेडझोनमधून येणाऱ्या विद्यार्थी, कामगार , मजूरांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तालुकास्तरावर विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले.मात्र संबंधितांना या ठिकाणी क्वारंटीन व्हा, असे म्हणणे ग्रामीण भागात भांडणाचे मूळ ठरत असल्याचे मालेगाव व रेगाव येथील २०, २१ मे च्या घटनेवरून दिसून येते.
परराज्यातून तथा मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरातून गावी परतण्यासाठी अडकलेल्या नागरिकांना शासनाकडून काही अटीवर परवानगी देण्यात आली. त्यानुसार येथून मोठ्या प्रमाणात मजूर, विद्यार्थी, कामगार आदींची घरवापसी सुरु आहे. गावात कोरोनाचा संसर्ग होवू नये , यासाठी प्रशासनाकडून गावपातळीवर कोरोना सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. मात्र रात्री- बेरात्री लपूनछपून आलेले अनेकजण घरातच बसून राहतात. संबंधित व्यक्तीची माहिती शेजारील नागरिक प्रशासनाला देण्याचा प्रयत्न करते. परंतु, आमचे नाव का कळविले, आमच्या घरात बाहेरून कुणीही आले नाही.
मग १४ दिवस क्वारंटीन का व्हावे, असे म्हणत ग्रामीण भागात वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. रेगाव आणि मालेगाव येथे वाद निर्माण झाला होता. मालेगावचे पोलीस वेळेवर पोहचवले आणि वाद मिटविले. काही ठिकाणी वाद निर्माण झाला तर तालुका प्रशासनाला जावून गावकº्यांची समजूत काढावी लागते. आतापर्यंत सात ते आठ ठिकाणी जावे लागले. गावात बाहेरगाववरून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची तपासणी करून क्वारंटीन करणे आवश्यक ठरत आहे.
हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्के
मालेगाव तालुक्यात परराज्य, परजिल्ह्यातून अनेक मजूर, कामगार, युवक परतत आहेत. या सर्वांच्या हातावर ‘होम क्वारंटीन’चे शिक्के मारले जात आहेत. १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परराज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाºयांनी स्वत:च माहिती प्रशासनाकडे द्यावी. असे न करता घरात लपून राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- आधारसिंग सोनोने,
पोलीस निरीक्षक, मालेगाव