CoronaVirus in Washim : एकाचा मृत्यू ; आणखी २८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:24 AM2020-07-13T11:24:29+5:302020-07-13T11:24:37+5:30
, ११ जुलै रोजी रात्रीदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार १२ जुलै रोजी दिवसभरात एकूण २८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या २४५ झाली असून, यापैकी १३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ११ जुलै रोजी रात्रीदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी २८ जणांची भर पडली. दुपारी २ वाजता प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील सुंदरवाटिका परिसरातील एकाच कुटुंबातील चार जण, कामरगाव ता. कारंजा येथील दोन जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ६.३० वाजता प्राप्त अहवालानुसार एकूण २२ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये रिसोड तालुक्यातील १४, मंगरूळपीर तालुक्यातील ६, कारंजा लाड व वाशिम तालुक्यातील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. रिसोड येथील इंदिरा नगर परिसरातील १२, सदाशिव नगर परिसरातील १, आंचळ (ता. रिसोड) येथील १ तसेच मंगरूळपीर येथील मंगलधाम, बढाईपुरा, दर्गा चौक व हुडको कॉलनी परिसरातील प्रत्येकी १ असे एकूण चार, तसेच चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ०२ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. हे सर्वजण जिल्ह्यातील यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. कारंजा तालुक्यातील रामनगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले असून सदर व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहे. वाशिम शहरातील बागवानपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या २४५ झाली असून, यापैकी १३४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत १०५ जणांनी कोरोनावर मात केली.
वाशिम शहरातील एका रुग्णाचा मृत्यू
७ जुलै रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील कुंभारपुरा येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा ११ जुलै रोजी एमजीएम, औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीला हृदयरोग असल्याने त्याची यापूर्वीच शस्त्रक्रिया होवून ‘पेसमेकर’ उपकरण बसविण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर हृदयरोगविषयक उपचार करणाऱ्या औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ११ जुलै रोजी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला.