CoronaVirus : वाशिम जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:48 AM2020-05-03T10:48:11+5:302020-05-03T10:48:27+5:30
गेल्या महिनाभरात तपासणी केलेल्या ५५ रुग्णांपैकी केवळ एकाचे थ्रोट स्वॅब नमुना पॉझिटीव्ह आला होता.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: वºहाडातील लगतच्या चार जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना वाशिम जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तपासणी केलेल्या ५५ रुग्णांपैकी केवळ एकाचे थ्रोट स्वॅब नमुना पॉझिटीव्ह आला होता. या व्यक्तीनेही कोरोनावर मात केली असून, जिल्ह्यात अजमेर येथून परतलेल्या सहा जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ शुक्रवार १ मे रोजी प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठविण्यात आले होते. हे सर्व अहवालही निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये कायमच आहे.
गा महिनाभराच्या काळात वाशिम जिल्ह्यात संशयित आढळून आलेल्या व्यक्तींचे ५५ ‘थ्रोट स्वॅब’ नमुने जिल्हा आरोग्य विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले, तर त्यात गत तीन दिवसांपूर्वी पाठविण्यात आलेल्या सहा जणांच्या ‘थ्रोट स्वॅब’चाही समावेश होता. तथापि, गेल्या महिनाभरात या ५५ पैकी केवळ मेडशी येथील एका व्यक्तीचा पहिला आणि पडताळणी नमुन्यांपैकी दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आढळला होता. त्यानंतरचे त्याचे सलग दोन नमुने निगेटीव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. त्यानंतर गत आठवड्यात पाठविलेले पाच नमुने निगेटीव्ह आल्याने वाशिम जिल्ह्याचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश झाला. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी वाशिम शहरात अजमेर येथून परत आलेल्या एका कुटुंबातील सहा जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने शुक्रवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या अहवालाकडे ‘ग्रीन झोन’मधील जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. हे सहा नमुनेही निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास सोनटक्के यांनी दिली. त्यामुळे वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये कायम राहिला आहे.