Coronavirus in Washim : ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला अहवाल ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:00 PM2020-04-17T13:00:13+5:302020-04-17T13:00:40+5:30
मेडशी येथील ५९ वर्षीय एका कोरोनाबाधित रुग्णाचा १५ दिवसानंतरच अहवाल शुक्रवार १७ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला आहे.
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील ५९ वर्षीय एका कोरोनाबाधित रुग्णाचा १५ दिवसानंतरच अहवाल शुक्रवार १७ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला आहे. आता १६ व्या दिवसानंतरचा त्याचा अहवाल येणे बाकी असून, याकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. परजिल्हा तसेच परराज्यातून आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी केली असून, या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान १ एप्रिल रोजी मेडशी येथील एका ५९ वर्षीय इसमाला संदिग्ध म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल्यानंतर, ३ एप्रिल रोजी संबंधित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या रुग्णावर १४ दिवस आरोग्य विभागाने विशेष वॉच ठेवून १५ व्या दिवशी त्याचा ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आला. १७ एप्रिल रोजी हा अहवाल निगेटिव्ह आला असून, १६ व्या दिवशीचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, १५ व्या दिवशीचा त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला असून, १६ व्या दिवशीचा अहवाल नेमका काय राहणार याकडे लक्ष लागून आहे.