CoronaVirus in Washim : आणखी चार पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ५३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 04:31 PM2020-06-14T16:31:47+5:302020-06-14T16:32:34+5:30
कारंजा शहरातील चार रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १४ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा शहरातील चार रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १४ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ४४ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. परराज्य, परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्य, परजिल्ह्यातून परतणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. या संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्याची व्यवस्थाही तालुकास्तरावरच करण्यात आली. गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. १४ जून रोजी यामध्ये ४ रुग्णांची भर पडली. कारंजा येथील ४ व्यक्तींचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आले असून, यामध्ये दोन २४ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष व ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. हे सर्वजण अमरावती येथे १२ जून रोजी कोरोनाबाधित आढळून आलेल्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे कारंजा शहर व तालुक्यात आता एकूण रुग्णसंख्या १३ अशी झाली आहे. जेथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तेथे प्र्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यास तसेच बाहेर ठिकाणच्या नागरिकांना प्रतिबंधीत क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात किती जण आले याची माहिती घेण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी सर्वे सुरू करण्यात आला. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्याची चिंता वाढली
गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाने कुणाच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.