CoronaVirus in Washim : ‘हाय रिक्स’ संपर्कातील १२ जणांचे नमुने तपासणीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:05 AM2020-04-05T11:05:44+5:302020-04-05T11:05:51+5:30
हायरिस्क संपर्कातील १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ ’हार्ड अॅण्ड फास्ट’ तत्त्वावर नागपूर येथे तपासणीला पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एकास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’ तपासणी अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना शुक्रवारी रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉरंटिन कक्षात हलविले. त्यापैकी हायरिस्क संपर्कातील १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ ’हार्ड अॅण्ड फास्ट’ तत्त्वावर नागपूर येथे तपासणीला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणे अपेक्षीत आहे. त्याशिवाय इतर दोघांचेही थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील संमेलनात सहभागी मेडशी येथील व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी प्राप्त झालेल्या त्याच्या थ्रोट स्वॅब तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनासह जिल्हाभरात खळबळ उडाली आणि खबरदारी म्हणून प्रशासनाने बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील त्याच्या कुटुंबियांसह १२ जणांना, तसेच लो रिस्क संपर्कातील ११ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यापैकी हायरिस्क संपर्कातील १२ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवार ३ एप्रिल रोजी रात्रीच ’हार्ड अॅण्ड फास्ट’ तत्त्वावर तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहेत. या नमुन्यांचा अहवाल दोन दिवसांत मिळणे अपेक्षीत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. ‘थ्रोट स्वॅब’ नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतरच त्यापैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला, ते कळू शकणार आहे.
संपर्कातील अमरावतीचे ८ जणांचे नुमने पाठविले
मेडशी येथे पॉझिटीव्ह आढळून आलेल्या नागरिकाने बडनेऱ्यात वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या ८ जणांचे नमुन े तपासणीस पाठविण्यात आले आहेत.
संपर्कातील व्यक्तींची माहितीचा शोध
मालेगाव तालुक्यातील कोरोना बाधित व्यक्तीच्या हायरिस्क आणि लोरिस्क संपर्कातील २३ जणांना आरोग्य विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असले तरी, या रुग्णाच्या संपर्कात आणखी काही लोक आले असल्याची शक्यता असल्याने या लोकांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन करीत आहे. संपर्कात आलेल्यामध्ये अकोल्याचे १३ जणांचा समावेश आहे.
मेडशी गाव केले ‘सील’; परिसरातील गावांचा ‘हाऊस टू हाऊस’ सर्व्हे
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या मेडशी गावाला प्रशासनाच्यावतिने सील करण्यात आले आहे. तर मेडशी परिसरातील गावांचा ‘हाऊस टू हाऊस’ सर्व्हे केल्या जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतिने देण्यात आली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तिची तपासणी केल्या जाणार असल्याचे आरोग्य विभाागाच्यावतिने सांगण्यात आले आहे.
बाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या (हायरिस्क) १२ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. या १२ जणांसह लोरिस्कमधील ११ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
- अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम