CoronaVirus In Washim : बाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १२ जणांचे नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 04:12 PM2020-04-05T16:12:51+5:302020-04-05T18:49:38+5:30
सर्व लोकांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एकास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’ तपासणी अहवालावरून स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना शुक्रवारी रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉरंटिन कक्षात हलविले. त्यापैकी हाय रिस्क संपर्कातील १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ ’हार्ड अॅण्ड फास्ट’ तत्त्वावर औरंगाबाद येथे तपासणीला पाठविले होते. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून, या सर्व लोकांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.
दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील संमेलनात सहभागी मेडशी येथील व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी प्राप्त झालेल्या त्याच्या थ्रोट स्वॅब तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनासह जिल्हाभरात खळबळ उडाली आणि खबरदारी म्हणून प्रशासनाने बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील त्याच्या कुटुंबियांसह १२ जणांना, तसेच लो रिस्क संपर्कातील ११ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यापैकी हायरिस्क संपर्कातील १२ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने जिल्हा सामान्य रुग्णालयाने शुक्रवार ३ एप्रिल रोजी रात्रीच ’हार्ड अॅण्ड फास्ट’ तत्त्वावर तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविले होते. या नमुन्यांच्या अहवालाकडे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासह जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागले होते. अखेर या सर्व लोकांच्या नमुन्यांचा अहवाल रविवारी २ वाजताच्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, सर्वच नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.