CoronaVirus in Washim : आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ८० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:05 AM2020-06-22T11:05:48+5:302020-06-22T11:06:17+5:30
आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८० झाली असून, यापैकी ५३ जण अॅक्टिव्ह आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २१ जून रोजी २२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, एक जण पॉझिटिव्ह तर २१ अहवाल निगेटिव्ह आले. वाशिम शहरातील लाखाळा भागात एक जण कोरोनाबाधित आढळून आल्याने शहरातही कोरोनाचा शिरकाव झाला. दुसरीकडे ६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८० झाली असून, यापैकी ५३ जण अॅक्टिव्ह आहेत.
बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चढत्या क्रमानेच असल्याचे दिसून येते. १९ जून रोजी पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३० अहवाल २० जूनला प्राप्त झाले असून, यापैकी ७ अहवाल पॉझिटीव्ह आले होते. यामध्ये रिसोड येथील आसन गल्ली येथील ४५ वर्षीय इसम, आसेगाव पेन (ता. रिसोड) येथील २९ वर्षीय महिला, तामसी (ता. वाशिम) येथील एकाच कुटुंबातील ३५ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा व २ वर्षीय बलिकेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. या रुग्णांच्या संपर्कात नेमके किती जण आले, याची माहिती आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार रिसोड तालुक्यातील या कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात एकूण १८ जण आले आहेत. तामसी येथील रुग्णाच्या संपर्कात नेमके किती जण आले, याची माहिती घेण्यात येत आहे. २२ जूनपर्यंत माहिती संकलन पूर्ण झाल्यानंतर या संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, २१ जून रोजी एकूण २२ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी एक पॉझिटिव्ह तर २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील ३३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती अमरावती येथून प्रवास करून आला असून कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असल्याने सदर व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासह पुढील आवश्यक कार्यवाही सुरू केल्याचे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८० असून, यापैकी ५३ रुग्ण सक्रिय (अॅक्टिव्ह) आहेत. दोन जणांचा मृत्यू तर २५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.
६ जणांना डिस्चार्ज
२१ जून रोजी सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील १, मालेगाव येथील १, कारंजा लाड येथील १ तसेच सुकळी (ता. कारंजा लाड) येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती अशा सहा जणांचा समावेश आहे. अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
२१ जून एकूण २२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. एक पॉझिटिव्ह तर २१ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ५३ जणांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक