CoronaVirus in Washim : आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 06:35 PM2020-06-13T18:35:25+5:302020-06-13T18:35:38+5:30
आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बोराळा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील एक, रिसोड तीन व कारंजा येथील दोन, शेलुबाजार एक अशा एकूण ७ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ४० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. १३ जून रोजी यामध्ये ७ रुग्णांची भर पडली. बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील ३२ वर्षीय महिलेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. सदर महिला बोराळा हिस्से येथील १० जून रोजी 'पॉझिटिव्ह' अहवाल आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
कारंजा लाड विश्रामगृह परिसरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिला व १५ वर्षीय युवतीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले. औरंगाबाद येथून रिसोड येथे आलेल्या २०, २४ व २७ वर्षीय युवकांचे कोरोनाविषयक चाचणी अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत.
शेलुबाजार (ता. मंगरुळपीर) येथील ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयातून 'रेफर' करण्यात आले होते. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ४९ अशी झाली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू तर सात जणांनी कोरोनावर मात केली. उर्वरीत ४० जणांवर तालुकास्तरीय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला एरिया सील करण्याची कार्यवाही पोलीस, महसूल, नगर परिषद, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने सुरू केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कात किती जण आले याची माहिती घेण्याबरोबरच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी सर्वे सुरू करण्यात आला.
एका रुग्णाला सुटी
भोयणी ता. मानोरा येथील ६० वर्षीय महिलेने कोरोनावर मात केल्याने या रुग्णाला १३ जून रोजी विलगीकरण कक्षातून सुटी देण्यात आली. आता एकूण ४० जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.