CoronaVirus in Washim : ‘कोविड केअर सेंटर’साठी स्थळांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:12 AM2020-04-17T11:12:21+5:302020-04-17T11:12:31+5:30
‘कोविड केअर सेंटर’साठी स्थळांची चाचपणी सुरु झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला असून, बाधित रुग्णांवर उपचाराकरीता जिल्हास्तरावर ‘कोविड हॉस्पिटल’, ‘कोविड हेल्थ सेंटर’ची तयारी झाल्यानंतर आता तालुकास्तरावर ‘कोविड केअर सेंटर’साठी स्थळांची चाचपणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीसह इतर शासकीय इमारतीत ही सुविधा कशी करता येईल, याचा विचार जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रसह देशात झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी राज्यशासनाच्या निर्देशानुसार प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. त्यात संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोना संसर्ग बाधित लोकांवर उपचार करण्यासाठी आयसोलेशन कक्ष उभारणे आवश्यक आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘कोविड हॉस्पिटल’ अंतर्गत ५० खाटांची सुविधा करण्यात आली, तर नर्सिंग होस्टेलमध्ये ‘कोविड हेल्थ सेंटर’ अंतर्गत शंभर खाटांची तयारी झालेली आहे. आता तालुकास्तरावर ‘कोविड केअर सेंटर’ची तयारी करण्यात येत असून, यासाठी सहाही तालुक्यातील ग्र्रामीण रुग्णालये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात येत आहे. सहा तालुक्यात प्रत्येक एक ‘कोविड केअर सेंटर’ ठेवण्यात येणार आहे. ही व्यवस्था करताना संबंधित ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीत बाह्यरुग्ण कक्षात येणाऱ्या रुग्णांचा किंवा इतरांचा कोविड केअर सेंटरशी संपर्क होणार नाही. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच आरोग्य विभाग ईमारतींची पाहणी करीत आहे.
इमारतींची पाहणी
कोविड केअर सेंटरसाठी तालुकास्तरावर कोणती शासकीय इमारत सुयोग्य राहिल, याची पाहणी आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या चमूतर्फे केली जात आहे. सहाही तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारती सुजज्ज आहेतच; परंतू याव्यतिरिक्त अन्य शासकीय इमारतींचीदेखील चाचपणी सुरू आहे. सुरकंडी येथील अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळेची या चमूने गुरूवारी पाहणी केली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन सुरू आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावरील आयसोलेशन कक्ष वगळता तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर ठेवण्याची तयारी असून, यासाठी आरोग्य विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या ईमारतींची पाहणी करण्यात येत आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम