CoronaVirus : विदेशातून आलेल्या पाच जणांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 02:31 PM2020-03-14T14:31:28+5:302020-03-14T14:31:37+5:30
आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: ’कोरोना’ विषाणूचा संसर्ग जगभरात वाढत असतानाच विदेशात असलेले मूळ वाशिमचे पाच जण परत आले आहेत. या पाचही जणांवर आरोग्य विभागाचा वॉच असून, त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, असे असले तरी, जिल्ह्यात अद्याप ‘कोरोना’चा एकही संशयित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी शनिवारी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना देशभरातील आरोग्य यंत्रणा या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वाशिम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानेही विशेष उपाय योजना आखल्या आहेत. या अंतर्गत विदेशातून वाशिममध्ये येत असलेल्या व्यक्तींवर प्रशासन जातीने लक्ष ठेवत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत. या पाचही जणांची प्रकृती चांगली असली तरी, आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित तपासणी करीत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तरी त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांत विदेशातून पाचच नागरिक परत आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याची कोणती लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तथापि, त्यांची नावे उघड करता येणार नाहीत.
-अंबादास सोनटक्के,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम