CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 07:00 PM2020-03-23T19:00:53+5:302020-03-23T19:01:08+5:30
दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
कोलार (वाशिम) :मुंबई, पुणेसारख्या महानगरात रोजगारासाठी गेलेले कामगार गावी परत येत आहे. या कामगारांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून १५ दिवस होम क्वारंटिनचा सल्ला देत आहे. यामुळे संबंधित कामगारांना काम करणे कठीण झाल्याने त्यांच्या उपासमारीची पाळी येत असल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.
मानोरा तालुक्यातील कोलार, हळदा, गिरोली, जगदंबा नगरसह इतर गावातील शेकडो कामगार रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात गेले होते. आता कोरोना विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्याने हे कामगार जिवाच्या भीतीने गावी परत येत आहेत. या कामगारांत एखाद्यालही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असल्यास इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. या पृष्ठभुमीवर प्रशासन त्याची माहिती घेऊन तपासणी करीत आहे. ही तपासणी केल्यानंतर संबंधित कामगारांना १५ दिवस होम क्वारंटिनमध्ये राहण्याचा अर्थात १५ दिवस घरीच थांबून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. जिल्हाभरातील नागरिकांच्या जिवाचा विचार करता ही बाब योग्य आहे. तथापि, हे सर्व कामगार मोलमजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यामुळे १५ दिवस घरात थांबावे लागत असेल, तर काम कोण करणार आणि कुटुंबाचे उदरभरण कसे करणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आल्याचे चित्र कोलार परिसरात पाहायला मिळत आहे.
-----------------
कोट: आम्ही रोजगारासाठी मुंबई येथे गेलो होतो. परत गावी आल्यानंतर आोग्य विभागाने तपासणी करून १५ दिवस घराबाहेर न निघण्याचा सल्ला दिला; परंतु आमचे उदरभरण मोलमजुरीवर असल्याने काम करणे आवश्यक आहे. आता घराबाहेर न पडता काम कसे करावे आणि कुटुंबाचे पोषण कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. शासनाने मोफत रेशन धान्य द्यावे आणि काही रक्कम खात्यात जमा करावी.
-मंगेश ताकतोडे,
कामगार, कोलार