बँकेत मजूरांच्या नावे बोगस खाते काढून कोट्यवधींचा भ्रष्टाचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:10 PM2019-08-01T12:10:05+5:302019-08-01T12:10:11+5:30

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार वाघळूद येथील ७९ लोकांनी बुधवार, ३१ जुलै रोजी येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Corruption of billions by bogus account in the name of laborers in the bank! | बँकेत मजूरांच्या नावे बोगस खाते काढून कोट्यवधींचा भ्रष्टाचार !

बँकेत मजूरांच्या नावे बोगस खाते काढून कोट्यवधींचा भ्रष्टाचार !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाघळूद (ता.मालेगाव) ग्रामपंचायत सरपंचासह रोजगार सेवक, पंचायत समितीचे अधिकारी व वाशिमच्या इलाहाबाद बँक शाखेने संगणमत करून शंभरापेक्षा अधिक लोकांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूर दाखवून त्यांच्या नावे बोगस खाते काढले व यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार वाघळूद येथील ७९ लोकांनी बुधवार, ३१ जुलै रोजी येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यासंदर्भातील तक्रारीत नमूद केले आहे, की वाशिमच्या इलाहाबाद बँकेच्या शाखेत आम्ही खाते काढण्याकरिता कुठलाही अर्ज केला नसताना त्याठिकाणी खोटे खाते तयार करण्यात आले आहेत. रोहयोच्या कामावर कधीच हजर नसताना खोटे मस्टर टाकून तथा बोगस स्वाक्षºया करून आर्थिक अपहार झाला. सरपंच, सचिव व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बैंक आॅफ इलाहाबाद, शाखा वाशिम येथील शाखाधिकाºयांशी संगनमत करून खोटे बँक खाते काढले व त्यात रोहयोअंतर्गत मजूरीचे पैसे टाकून सदरचे पैसे सरपंच कृष्णा देशमुख व त्यांच्या साथीदारांनी हडपले. संबंधित लोकांनी रोहयोची कामे परस्पर करून वाशिम, मालेगाव व अन्य ठिकाणच्या बँकांमध्ये खोटे खाते काढून तथा परस्पर पैसे काढून भ्रष्टाचार केला आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे काही मयत व्यक्तींनाही रोहयोच्या कामावर दाखविण्यात आले.
अनुसयाबाई देशमुख यांच्या नावे २०१८-१९ या वर्षात काम केल्याबाबतचे खोटे मस्टर काढण्यात आले; मात्र त्या साधारणत: ५ वर्षांपूर्वी मयत झालेल्या आहेत. तसेच रायाजी फकीरा डोंगरदिवे हे २ वर्षांपूर्वी; तर बाबाराव रुस्तमराव देशमुख हे ५ वर्षांपूर्वी मयत झाले असून ते सरपंच कृष्णा देशमुख यांचे सख्खे काका आहेत. वरील तिन्ही लोकांना रोहयोच्या कामावर दाखवून त्यांच्या नावे खोटे मस्टर काढून तथा खोटे दस्तावेज तयार करून भ्रष्टाचार करण्यात आला. तथापि, या गंभीर प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे व भ्रष्टाचारातून गोळा केलेल्या रक्कमेची वसूली करण्यात यावी; अन्यथा ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषण करू, असा इशाराही ७९ लोकांनी दिला. तक्रारीची प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.


बोगस बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांचा ‘विड्रॉल’!
अनेक लोकांना मजूर दाखवून त्यांच्या नावाने परस्पर वाशिमच्या इलाहाबाद बँकेच्या शाखेत खाते सुरू करण्यात आले. त्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे जमा झालेले पैसे सरपंच कृष्णा देशमुख व त्यांच्या साथीदारांनी शाखाधिकाºयांशी संगणमत करून विड्रॉल केले. यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला, असा आरोप भागवत अंभोरे, बळीराम ढोरे, ज्ञानबा मस्के, अनिल इढोळे, राजकुमार देशमुख, विष्णू देशमुख, सतीश काकडे, अंकुश मस्के, संतोष देशमुख, दत्ता अंभोरे, गोपाल देशमुख, संदिप अंभोरे यांच्यासह ७९ लोकांनी केली आहे.

पोलिस पाटील यांच्या नावाचेही मस्टर
वाघळूद येथील पोलिस पाटील अजाबराव देशमुख हे सरपंच कृष्णा देशमुख यांचे काका असून कायद्याप्रमाणे त्यांना रोहयोमध्ये काम करता येत नाही. असे असताना त्यांच्या नावेही रोहयोमध्ये काम केल्याबाबतचे मस्टर काढण्यात आले आहे, असे तक्रारकर्त्या मजूरांचे म्हणणे आहे.

१८ वर्षाखालील मुलांना दाखविले रोहयोचे मजूर
सरपंचासह अन्य दोषी व्यक्तींनी रोहयोच्या निधीत गैरप्रकार करित असताना १८ वर्षांखालील ५ मुलांना रोहयोचे मजूर दाखवून त्यांच्या नावे मस्टर तयार केले आहे. त्यात शिवकुमार मस्के (१५), अक्षरा मस्के (९), ओम देशमुख (१२), नागेश देशमुख (१६) आणि योगेश देशमुख (१६) या मुलांचा समावेश आहे. यासह बाहेरगावी शिकायला, नोकरीला असलेल्या १६ लोकांनाही रोहयोच्या कामावर दाखविण्यात आले. विशेष गंभीर बाब म्हणजे खूनाच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या नावेही संबंधितांनी मस्टर काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

इलाहाबाद बँकेत वाघळूद परिसरातील लोकांचे निश्चितपणे बँक खाते काढण्यात आलेले आहेत; मात्र बँकेच्या नियमानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतरच हे खाते तयार झालेले आहेत. यामध्ये बँकेकडून कुठलाही कसूर करण्यात आलेला नाही. संबंधित काही लोकांनी गैरप्रकार केला असल्यास त्याबाबत आपण जबाबदार नाही.
- विपूल अग्रवाल
शाखा व्यवस्थापक,
इलाहाबाद बँक, वाशिम

रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रात कामे करित असताना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. चुकीच्या पद्धतीने किंवा बोगस लाभार्थींचे मस्टर तयार करणे किंवा त्यांच्या नावाने बँकेत परस्पर खाते काढलेले नाहीत. काही लोकांकडून हेतुपुरस्सरपणे आपणास बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात असून चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत.
- कृष्णा देशमुख
सरपंच, वाघळूद ग्रामपंचायत

Web Title: Corruption of billions by bogus account in the name of laborers in the bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.