अतिपावसाने उद्धस्त झाली ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:34 PM2020-10-04T17:34:18+5:302020-10-04T17:34:41+5:30
Agriculture News Washiim पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी महसूल मंडळात यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकºयांना असताना सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामुळे कपाशीला फटका बसून, जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी शेतात पाणी साचल्याने उद्धस्त झाली आहे. या पिकाच्या पात्या आणि बोंडेही गळून पडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात इंझोरी महसूल मंडळात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसला. त्यात दुबार, तिबार पेरणी काही शेतकºयांना करावी लागली. त्यामुळेच शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कपाशीच्या पिकाला यंदा पसंती दिली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार या मंडळात कपाशीचे क्षेत्र २ हजार ४१४ हेक्टर आहे. यातील अनेक शेतकºयांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली, तर काहींनी जूनच्या पहिल्याच पावसानंतर कपाशीची पेरणी केली. हे पीक जुलैपर्यंतच्या पोषक वातावरणामुळे चांगले बहरले. त्यानंतर मात्र आॅगस्टमधील पावसाने या पिकाला फटका बसला. त्या नैसर्गिक आपत्तीतून हे पीक सावरत असतानाच सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाचा तडाखा पुन्हा या पिकाला बसला. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि कपाशीच्या पात्या, बोंडे गळून कपाशी सुकली. जवळपास ४० हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्धस्त झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकºयांना आता या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. तथापि, प्रशासनाने या पीक नुकसानाची पाहणीच अद्याप केली नाही. (वार्ताहर)