कापूस उत्पादन खर्च २९०००, बाजारात भाव ५००० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:59 AM2020-11-07T11:59:01+5:302020-11-07T11:59:15+5:30
Washim Agriculture News शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बॉ सोयाबीनच्या पिकात यंदा शेतकऱ्यांना घाटा सहन करावा लागत असतानाच कपाशीच्या पिकाचीही अवस्था गंभीर आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी यंदा लागवड खर्च २९००० हजार रुपये आला असताना नैसर्गिक संकटांनी खराब झालेल्या कपाशीचे उत्पादन घटले आणि एकरी ५ क्विंटलही उत्पादन होत नसून, शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे एकरी ४ हजाराचा घाटा सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात अद्याप शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही. काही व्यापाऱ्यांनी कपाशीची खरेदी सुरू केली असली तरी, परतीच्या पावसासह बाेंडअळीचा फटका बसल्याने कापसाच्या उत्पादनासह दर्जाही खालावला त्यामुळे बाजारात व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेण्यास टाळाटाळ करीत असून, दरही अधिकाधिक ५ हजार रुपये प्रति क्विंटल मिळत असल्याचे दिसते.
यंदा पाच एकरात कपाशी पिकाची लागवड केली. त्यात सततच्या पावसासह परतीच्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले, उत्पादन घटले आणि दर्जाही खालावला. एकरी २९ हजार रुपये खर्च झाला व केवळ ५ क्विंटल उत्पादनही हाेऊ शकले, तर बाजारात केवळ ५ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहेत. त्यामुळे केलेला खर्चही वसूल झाला नाही.
- आशिष जटाळे, शेतकरी, इंझोरी
कपाशीला गतवर्षी चांगले दर मिळाले. त्यामुळे सोयाबीन ऐवजी कपाशीला पसंती दिली या पिकासाठी यंदा एकरी २९ हजारांपेक्षा अधिक खर्च आला, तर उत्पादन ५ ते ५.५० क्विंटल. होत आहे. त्यात बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढल्याने पुढे आणखीच नुकसान होणार आहे. त्यामुळे यंदा या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले. उलट तोटा सहन करावा लागत आहे.
- दादाराव टेकाडे
शेतकरी, धनज खु.