कापसाचे दर गडगडले; उत्पादक अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 02:41 PM2019-12-20T14:41:16+5:302019-12-20T14:41:43+5:30
व्यापारी हमीदरापेक्षा २०० ले ३०० रूपयांनी कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा अवकाळी पावसामुळे कापसाची प्रतवारी खालावली, तसेच ऊचल कमी असल्याने जिल्ह्यात कापसाचे दर पडले आहेत. त्यामुळे कापूस ऊत्पादकांची पंचाईत झाली आहे. व्यापारी हमीदरापेक्षा २०० ले ३०० रूपयांनी कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढत आहे. तथापि, या ठिकाणी चुकाऱ्यांना विलंब होत असल्याने येथेही कापूस विकावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे कापसाची विक्री ठप्प पडली आहे.
मान्सून विलंबाने दाखल झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यात यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट झाली होती. सरासरी २९ हजार ७०१ हेक्टरवर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना केवळ २५ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी शेतकºयांनी केली होती. त्यात मानोरा तालुक्यात मात्र सरासरी क्षेत्र ७ हजार २७८ हेक्टर असताना या तालुक्यात १३ हजार २३२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात शेतकºयांनी कपाशीचीच पेरणी केली होती. त्या खालोखाल कारंजा तालुक्यात ९ हजार ९६ हेक्टर, तर मंगरुळपीर तालुक्यात १ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रात कपीची पेरणी झाली होती. इतर तालुक्यांत मात्र एक हजार हेक्टर क्षेत्रातही कपाशीची पेरणी होऊ शकली नव्हती. सुरुवातीच्या विषम वातावरणानंतर कपाशीचे पीक चांगले बहरले; परंतु बोंडअळीने सलग तिसºया वर्षी या पिकावर आक्रमण केले, तर आॅक्टोबर अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले. त्यातच बोंडअळीवर नियंत्रण शक्य नसल्याने अनेक शेतकºयांनी पहिल्या, दुसºया वेचणीनंतरच कपाशीची उलंगवाडी करून शेत रब्बीसाठी तयार केले. आधीच कपाशीचे उत्पादन घटले असताना बाजारात या शेतमालास अपेक्षीत दरही मिळेनासे झाले. गतवर्षी व्यापाºयांनी ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत कपाशीची खरेदी केली असताना यंदा मात्र कपाशीला अधिकाधिक ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलने त्यांच्याकडून कपाशीची खरेदी होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी पंचाईत झाली असून, अनेक शेतकरी शासकीय केंद्रावर कापूस विकण्याची तयारी करीत आहेत. तथापि, या केंद्रावर कापूस विकल्यानंतर शेतकºयांना आठ ते दहा दिवस चुकाºयासाठी प्रतिक्षा करावी लागते. आरटीजीएस पद्धतीने शेतकºयांच्या थेट खात्यावर शासकीय केंद्राकडून कपाशीची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे या केंद्रावर शेतमाल विकावा की नाही, असाही प्रश्न शेतकºयांना पडला आहे.
कापूस पणन महासंघाच्या शासकीय केंद्रांवर समाधानकारक खरेदी
जिल्ह्यातील दोन खरेदी केंद्रावर कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाचे (सीसीआय) प्रतिनिधी म्हणून कापूस पणन महासंघाने (फेडरेशन) जिल्ह्यात कारंजा आणि मानोरा येथे २ डिसेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. या दोन्ही केंद्रांना शेतकºयांचा समाधानकारक प्रतिसाद लाभत आहे. त्यात कारंजा येथील केंद्रावर १९ डिसेंबरपर्यंत २ हजार २६ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. तर मानोरा येथील केंद्रावर ११५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या केंद्रावर कापूस विकण्यासाठी शेतकरी उत्सूूक असल्याने यंदा शासकीय खरेदीत १० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी होण्याचा अंदाज अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शासनाने यंदा मध्यम धाग्याच्या कपाशीसाठी ५,२२५ रुपये, तर लांब धाग्यासाठी ५,५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत.
कारंजात २ डिसेंबरपासून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. केंद्रावर कापूस विकण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आता येत आहेत. आजवर या ठिकाणी २ हजार २६ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. या ठिकाणी ५ हजार क्विंटल पेक्षा अधिक कापूस खरेदी होण्याचा अंदाज आहे.
- यू. एस. जानोरकर, ग्रेडर कारंजा (फेडरेशन)