कपाशीची पेरणी १२ टक्क्यांनी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:18 PM2020-07-19T16:18:34+5:302020-07-19T16:18:48+5:30
१७ जुलैपर्यंत २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदा नियोजित क्षेत्राच्या तुलनेत कपाशीची पेरणी १२ टक्क्यांनी वाढली आहे. जिल्ह्यात १९ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना १७ जुलैपर्यंत २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. त्यात मानोरा तालुक्यात नियोजित क्षेत्राच्या तुलनेत पाच पटीने कपाशीचे क्षेत्र वाढले आहे, तर वाशिम तालुक्यातही शेतकºयांनी कपाशीकडे कल केल्याचे कपाशीच्या वाढलेल्या क्षेत्रावरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ६ हजार ४१ हेक्टरपेक्षा काही अधिक क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात शेतकºयांनी खरीप पेरणीला सुरुवात केल्याने १७ जुलैपर्यंत ३ लाख ७५ हजार ६७१ हेक्टर पेक्षा काही अधिक क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यात कपाशीच्या क्षेत्रात यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा १९ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. त्यातही मानोरा तालुक्यात यंदा कपाशीचे क्षेत्र पाच पटीने वाढले आहे. या तालुक्यात कपाशीच्या पेरणीचे नियोजन केवळ १ हजार ८६८ हेक्टर क्षेत्रावर असताना प्रत्यक्षात ५ हजार ९ हजार ७४० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे. वाशिम तालुक्यातही कपाशीचे नियोजित क्षेत्र जवळपास २६१ हेक्टर असताना जवळपास ५४१ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.
निकृष्ट सोयाबीन बियाण्याचा परिणाम
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. ही पेरणी करताना बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनकडे पाठ करून कपाशी, मुग, उडिद या पिकावर भर दिला. त्यामुळेच कपाशीच्या क्षेत्रात यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
इतर चार तालुक्यात क्षेत्र कमी
जिल्ह्यात कपाशीच्या पेºयात मंगरुळपीर तालुक्यात नियोजित क्षेत्राच्या तुलनेत ८७.५ टक्के, कारंजा तालुक्यात ६३.१५ टक्के, मालेगाव तालुक्यात ६१.७४ टक्के, तर रिसोड तालुक्यात १७.६९ टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे.