रोजगार हमी योजनेतून देशाला दिशा मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:14+5:302021-07-23T04:25:14+5:30
वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. ...
वाशिम : राज्यात १९७१ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना स्थानिकांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना राज्यात अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेतून देशाला दिशा मिळाल्याचे मत रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केले.
२१ जुलैरोजी रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि.स. पागे यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मी समृध्द, गाव समृध्द’ या विषयावरील ऑनलाईन संवाद सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून नंदकुमार वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. सभेत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सहभागी होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व रोहयोचे प्रभारी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, राज्यातील काही जिल्हयात रोहयोतून चांगले काम झाले आहे. ३५ वर्षांनंतर रोहयो कायदा येऊन तो देशभर लागू झाला आहे. या कायदयाअंतर्गत १०० दिवसांच्या रोहयो कामाची हमी देण्यात आली आहे. राज्यात त्यावेळी पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याचे आणि स्थानिकांचे स्थलांतर रोखण्याचे काम या योजनेतून करण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी हा कायदा राज्यात आला. २०२० मध्ये वि. स. पागे असते, तर त्यांनी एक नवीन विचार घेऊन प्रत्येकजण लखपती कसे होतील, याचे नियोजन केले असते. ‘मी समृध्द, गाव समृध्द’चे बारा निकष हे शाश्वत विकासाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
०००००००
कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक
गावात एकही बालक कुपोषित राहणार नाही, असे सांगून नंदकुमार म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी ग्रामस्थांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण तेरापेक्षा जास्त असावे. कोणतेही कुटुंब दारूमुळे उदध्वस्त होणार नाही, यासाठी कोणीही दारू पिणार नाही, याकडे लक्ष दयावे. मुलांना मूलभूत गणित तसेच इंग्रजी बोलता आले पाहिजे. जलसाक्षरता ही काळाची गरज असून, पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही नंदकुमार यांनी सांगितले.