लग्नसराईत बसतोय कॅशलेसचा दोन टक्क्यांचा फटका
By admin | Published: May 29, 2017 01:36 AM2017-05-29T01:36:53+5:302017-05-29T01:36:53+5:30
एटीएम, बँका झाल्या कॅशलेस : व्यापाऱ्यांकडून लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अलीकडे लग्नसराईचे दिवस असून, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वधू-वरांचे आणि वऱ्हाडी मंडळींसाठीच्या साहित्य आणि कपड्यांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे अकोला सराफा बाजारात आणि कापड बाजारात दररोज लक्षावधींची उलाढाल होत आहे. ही उलाढाल होत असताना मात्र अनेकांना कॅशलेसचा मोठा फटका सहन करावा लागतो आहे.
मागील नोव्हेंबरमध्ये झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर देशभरातील एटीएममधील कॅश कमी करण्यात आली आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवून कॅशलेसला चालना दिली जात आहे. ई-बँकिंगच्या आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पॉस मशीन घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. नोव्हेंबर महिन्यानंतर आता बाजारपेठेतील व्यवहार पर्यायाने पॉस मशीनने सुरू झालेत. शासनाकडून कॅशलेस व्यवहारासाठी सबसिडी मिळेल, ही अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. उलटपक्षी विविध सरकारी आणि खासगी बँकांनी पॉस मशीनच्या प्रत्येक व्यवहारावर दोन टक्के सेवाकर घेणे सुरू केले आहे. हा सेवाकर कुणी भरावा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सबसिडी तर मिळाली नाही, उलटपक्षी प्रत्येक व्यवहारावर दोन टक्क्यांची लूट सुरू झाली आहे.
शहरातील बहुतांश एटीएममध्ये कॅश नाही. त्यामुळे एटीएममधून रक्कम निघणे कठीण झाले आहे. दुसरीकडे बँकांमधून मोठी रक्कम कॅश स्वरूपात मिळणे कठीण झाले आहे. आपल्या बँक खात्यात रक्कम असूनही योग्य वेळी ती मिळत नसल्याने लोक त्रासले आहेत. त्यात लग्नसराईच्या निमित्ताने बाजारात आलेल्या लग्न वऱ्हाडींना पॉस मशीनशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे या लोकांच्या सोन्याच्या खरेदीवर दोन टक्के आणि कापडाच्या खरेदीवर दोन टक्के, असा चार टक्के सेवाकर द्यावा लागतो आहे. वास्तविक पाहता दोन टक्क्यांची कराची रक्कम ही व्यापाऱ्यांनी भरायची आहे; मात्र व्यापारी ग्राहकांना कॅश मागतो. कॅश नसल्याने पर्यायाने तो स्वाइप करण्याचे आणि दोन टक्के अतिरिक्त लागणार असल्याचे सांगतो. बाजारपेठेत वऱ्हाडी मंडळीसोबत आलेल्या वधू-वराच्या परिवाराला कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध राहत नसल्याने त्यांना सेवाकराचा हा फटका सहन करावा लागतो आहे.
पॉस मशीनचा दोन टक्क्यांचा फटका व्यापारीच सहन करतो. कुणी ही रक्कम ग्राहकावर लादत असेल तर चुकीचे आहे. सुवर्णकाराची मजुरी आम्ही घेतो.
- प्रकाश सराफ, व्यावसायिक अकोला.