कोविड योद्ध्यांना नुसताच ‘मान’; तीन महिन्यांचे मानधन थकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:26+5:302021-07-09T04:26:26+5:30
कोरोनाकाळात जिल्ह्यात ९ शासकीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्याठिकाणी रुग्णसेवा करण्यासाठी २१४ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात ...
कोरोनाकाळात जिल्ह्यात ९ शासकीय कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्याठिकाणी रुग्णसेवा करण्यासाठी २१४ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. दरम्यान, कोविड केअर सेंटरमध्ये तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी इमानेइतबारे कर्तव्य पार पाडून रुग्णसेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले, मात्र अनेकांना मार्च महिन्यापासून; तर काही कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यातून रोष व्यक्त होत आहे. केवळ कोरोना योद्धा म्हणून सन्मान मिळू नये; तर प्रशासनाने पोटापाण्याचा विचार करून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ अदा करावे, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे.
..............................
कोरोनाकाळात मानधनावर घेतलेले कर्मचारी - २१४
सध्या कामावर असलेले कर्मचारी - २१४
किती कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा - ११०
सध्या सुरू असलेले कोविड केअर सेंटर - ०९
.......................
त्रुटी दाखवून अनेकांचे मानधन थांबविले
कोरोनाकाळात मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन प्रस्तावात त्रुटी काढण्यात आल्या आहेत.
मानधन अदा करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचारी मानधनापासून वंचित राहत आहेत.
काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्रुटी निघालेल्या आहेत. संबंधितांनी त्या दूर केल्यास मानधन लवकर मिळणे शक्य आहे.
.................
केवळ मान दिल्याने पोट नाही भरत
कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळाल्याने रोजगाराचा प्रश्न मिटला, असे वाटत होते; मात्र गरज संपत चालल्याने नोकरी कधी जाईल, याची शाश्वती नाही. दुसरीकडे मार्च महिन्यापासून मानधनही मिळाले नाही.
- विपुल निचळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
........................
कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा करताना कोविड योद्धा म्हणून सन्मान मिळत आहे; मात्र त्याने पोट भरणार नाही. त्यासाठी प्रशासनाने ठरवून दिलेले मानधन दर महिन्यात अदा करायला हवे; मात्र एप्रिल महिन्यापासून मानधन मिळाले नाही.
- वैभव बोरकर, अधिपरिचारक
........................
आरोग्य विभागात नोकरी लागणार, अशी अपेक्षा ठेवून त्यासाठी लागणारे शिक्षण घेत आहे. यादरम्यान कोरोनाचे संकट उद्भवले आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली; मात्र मानधन प्रलंबित असल्याने नाराजी आहे.
- चेतन राऊत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
.................
करार संपल्यानंतर कंत्राटी कर्मचारी कामावरून कमी केले जाणार
आरोग्य विभागातील कार्यरत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडू नये आणि रुग्णसेवेतही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी तीन महिन्यांचा करार करून २१४ कंत्राटी कर्मचारी सेवेत नियुक्त करण्यात आले. कोरोनाचे संकट आता निवळत चालले असून करार संपल्यानंतर कंत्राटी कर्मचारीही कामावरून कमी केले जाणार आहेत.
...................
कोट :
तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर कोविड केअर सेंटरमध्ये २१४ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या मानधनासाठी पुरेसा निधी आहे; मात्र काहींच्या बँक खात्यांमध्ये त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेकांचे त्रुटीविरहित प्रस्ताव अप्राप्त आहेत, त्यामुळे मानधनास विलंब होत आहे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरेाग्य अधिकारी, वाशिम