‘कोविशिल्ड’ संपली; ‘कोव्हॅक्सीन’चे केवळ २४ हजार डोस शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:35 AM2021-04-01T10:35:31+5:302021-04-01T10:35:49+5:30

Corona Vaccination : कोविशिल्डचे ४६ हजार आणि कोव्हॅक्सीनचे ३७ हजार असे एकूण ८३ हजार डोस उपलब्ध झाले होते.

‘Covishield’ is over; Only 24,000 doses of covacin left! | ‘कोविशिल्ड’ संपली; ‘कोव्हॅक्सीन’चे केवळ २४ हजार डोस शिल्लक!

‘कोविशिल्ड’ संपली; ‘कोव्हॅक्सीन’चे केवळ २४ हजार डोस शिल्लक!

Next

- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत कोविशिल्डचे ४६ हजार आणि कोव्हॅक्सीनचे ३७ हजार असे एकूण ८३ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी ५२ हजार जणांनी आतापर्यंत लस घेतली असून, कोविशिल्डचे डोज संपले आहेत तर कोव्हॅक्सीनचे केवळ २४ हजार डोज सध्या शिल्लक आहेत.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले; मात्र आकडा नियंत्रणात होता. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा अक्षरश: ‘स्फोट’ झाला असून बाधितांचा एकूण आकडा सध्या १६ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडाही १८७ वर पोहोचला आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे १७ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे.
याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५४३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि २५७४ कर्मचाऱ्यांना दुसरा डोज देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’पैकी ५८०४ जणांनी पहिला व २२४७ जणांनी लसीचा दुसरा डोज घेतला. ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील सुमारे ६ हजार लोकांना लस देण्यात आली असून ५९ पेक्षा अधिक वय असलेल्या २० हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांचेही लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या आरोग्य विभागाकडे कोव्हॅक्सीनच्या दोन हजार डोजचा साठा असून साधारणत: २२ हजार डोज ‘फिल्ड’वर शिल्लक आहेत; तर कोविशिल्ड लस संपली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड लसीचा तुटवडा आहे; मात्र कोव्हॅक्सीन ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. १ लाख ४० हजार लसची मागणी शासनाकडे नोंदविली असून शनिवारपर्यंत ती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेत कुठलाही अडथळा जाणवणार नाही.
- प्रसाद शिंदे
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: ‘Covishield’ is over; Only 24,000 doses of covacin left!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.