कोरोना पार्श्वभूमीवर शिवजयंतीचा खर्च टाळून उद्यानाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:06+5:302021-04-01T04:43:06+5:30
कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे अनेक सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी ...
कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे अनेक सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही साधेपणानेच साजरी करावी लागणार आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी अनेक ठिकाणी युवकांनी लोकवर्गणी केली आहे. त्यामुळे या पैशांचे काय करावे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. यात कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील नवदुर्गा तरुण उत्साही मंडळाचाही समावेश आहे. या मंडळातील युवकांनी शिवजयंतीसाठी २१ हजार रुपये गोळा केले आहेत. या पैशांचा सदुपयोग व्हावा, हा विचार त्यांनी केला व गावातील भवानी माता मंदिरासमोर उद्यानाची निर्मिती केली. या उद्यानात ६० चौरस मीटर जागेत त्यांनी लॉन लावले. सभोवताल मेहंदीची झाडे लावली. लॉनवर पाणी टाकण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय केली. उद्यानाच्या चहुबाजूला लोखंडी अँगल आणि तारांचे कुंपण घातले. बसण्यासाठी तीन सिमेंटचे बाकही ठेवले, तसेच येथे विरंगुळ्यासाठी येणाºया लोकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली. हा उपक्रम संगणक अभियंता असलेल्या निखिल लळे याच्या संकल्पनेतून, प्रज्योत काळे, आकाश निंघोट, विक्रांत काळे, नावेद शेख, गणेश काळे, निशांत काळे, स्वप्नील अंबुलकर, अमोल लळे, वेदांत काळे, आदित्य अबुंलकर, ऋषिकेश निंघोट, ओम काळे, या युवकांनी पूर्णत्वास आणला आहे.
------------
वाचनासाठी वृत्तपत्रांची सोय
धजन बु. येथील युवकांनी शिवजयंतीसाठी गोळा केलेल्या लोकवर्गणीतून जनतेच्या विरंगुळ्यासाठी उद्यानाची निर्मिती करून त्यात विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्याच आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या ठिकाणी येणाºयांच्या ज्ञानात भर पडावी, वाचनाची आवड लोकांत निर्माण व्हावी, या उद्देशाने या ठिकाणी नियमित वृत्तपत्राची व्यवस्थाही केली आहे. त्यांचा या उपक्रमाचे सर्व गावकºयांकडून कौतुक करण्यात येत आहे.