कारंजा शहरातील दगडफेक, दुकान तोडफोडप्रकरणी ३५ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 05:41 PM2021-11-13T17:41:39+5:302021-11-13T17:41:47+5:30
Viloance in Karanja : दोघांना अटक केली असून, शहरवासियांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
कारंजा लाड : त्रिपुरा राज्यातील घटनेचे शुक्रवारी (दि.१२) कारंजात पडसाद उमटल्यानंतर, दुकानांची तोडफोड आणि दगडफेकप्रकरणी शनिवारी (दि.१३) जवळपास ३५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दोघांना अटक केली असून, शहरवासियांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
त्रिपुरा राज्यातील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुस्लिम संघटनेच्यावतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार कांरजातील व्यावसायिकांनाही दुकाने बंद करण्यास संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले असता काही दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यावरून शहरातील तीन दुकानांची तोडफोड करून दगडफेक केली होती. यासंदर्भात गजानन जगदेव पारधी यांनी कारंजा शहर पोलीसात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी अज्जु, मो. वसीम मो इब्राहीम, अब्दुल समीर अब्दुल आरीफ, युसुफ खान सुल्तान खाना, शेख सोहेल शेख कौसर व फिरोज कासम प्यारेवाले यांच्यासह ३० ते ३५ अज्ञात व्यक्तींविरूध्द भांदविच्या ३०७, ४५२, २९४, ४२७, १४३, १४९, १३५ मुंबई पोलीस अॅक्ट व इतर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मो. वसीम व फिरोज कासम यांना अटक करण्यात आली. कर्तव्यावर असणाºया उमेश हरिश्चंद्र चचाणे या पोलीस कर्मचाºयाला आरोपींनी मारहाण केल्याने त्यांच्याविरूध्द भांदविच्या कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.
मिश्रवस्तीत पोलिसांचे पथसंचलन
कारंजा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी १३ नोव्हेंबर रोजी कारंजा येथे भेट देउन परिस्थितीची पाहणी केली तसेच त्यांच्या उपस्थिती शहर पोलिसांनी शहरातील मिश्र वस्तीतुन पथसंचलन करून शहर वासियांना शांततेचे आवाहन केले. या पथसंचलनात गोरख भामरे यांच्यासह प्रभारी उपविभागीय अधिकारी अनिल ठाकरे व ठाणेदार आधारसींग सोनोने, ७ अधिकरी, ४० कर्मचारी, ५ वाहन व एक क्युआरटी व आरसीपी पथक सहभागी झाले होते. शहर पोलिस स्टेशन परीसरातुन या पथसंचलनास सुरूवात झाली. त्यानंतर शहरातील मिश्र वस्तीतुन मार्गक्रमण करीत शहर पो.स्टे. परीसरातच पथ संचलनाचा समारोप करण्यात आला.