दहशत पसरविणाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा
By admin | Published: May 31, 2017 01:02 AM2017-05-31T01:02:44+5:302017-05-31T01:02:44+5:30
व्यापाऱ्यांमध्ये समाधान : आरोपीला तीन दिवस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या बालाजी संकुलाजवळ एका युवकाने शस्त्र हातामध्ये घेऊन दहशत पसरविली होती. याप्रकरणी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे सविस्तर वृत्त २६ मे रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दखल घेऊन आकाश गवळी याच्याविरुद्ध २७ मे रोजी आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला.
वाशिम शहरातील बालाजी संकुल परिसरात आकाश गवळी नामक युवकाने मुख्य रस्त्यालगत पानपट्टीचा खोका उभा केला. या खोक्यामुळे शंकर ऊर्फ पप्पू नेनवाणी या व्यापाऱ्याला अडथळा निर्माण झाल्याने नेनवानी व आकाश गवळी याचेमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आकाश गवळी याने फरशी कुऱ्हाड घेऊन परिसरात दहशत पसरविली. या घटनेची उपस्थित नागरिकांनी चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. या घटनेची नेनवाणी यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली; परंतु शहर पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या युवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण निस्तरण्याचा प्रयत्न केल्याचे सविस्तर वृत्त २६ मे रोजी प्रसिध्द केले होते. या वृत्ताची पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व ठाणेदार मानकर यांनी दखल घेऊन गवळी याला अटक केली. त्याच्याकडून एक चाकू व फरशी कुऱ्हाड जप्त केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.