शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:50 PM2020-06-22T16:50:27+5:302020-06-22T16:50:51+5:30
अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
१० जूनपासून ते १५ जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील ७५ टक्के शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख ९५ हजार ३९ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. २१ जूनपर्यंत जिल्ह्यात जवळपास तीन लाख हे्क्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. पेरणीनंतर पाच, सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मेडशी, मुंगळा,शिरपूर, केनवड, रिठद यासह अनेक गावातील शेतात पेरलेले बियाणे उगवले नाही. यामुळे शेकडो शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दुबार पेरणीचे संकट असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेडशी येथील धर्मदास चव्हाण यांच्यासह शेतकºयांनी सोमवारी केली.
शेतकरी चिंतातूर
मुंगळा परिसरात जवळपास ८५ टक्के पेरण्या आटोपल्या. पेरणीनंतर ८,१० दिवस उलटले तरी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. अनेक शेतकºयांनी घरगुती, उत्पादक कंपनी, विविध कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु ८, १० दिवसानंतरही बियाणे उगवले नाही. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.