वाशिम जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:16 PM2021-03-04T12:16:29+5:302021-03-04T12:16:54+5:30

Water scarcity in Washim District जिल्ह्यातील ३९२ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ ४२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या.

Crisis of water scarcity in 392 villages in Washim district | वाशिम जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट

वाशिम जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उन्हाळ्याला सुरुवात होत नाही, तोच पाणीटंचाईचे सावट गडद होत असून, पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. यानुसार जिल्ह्यातील ३९२ गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ ४२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या.
उन्हाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने आणि त्यानंतरही परतीचा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा होता. मात्र, सिंचनासाठी पाण्याचा बऱ्याच प्रमाणात उपसा झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट आली. पाणीटंचाई निवारणार्थ दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे कृती आराखडा तयार केला जातो. या वर्षीच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली असून, ३९२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ४२२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात हातपंप बंद असल्यानेही नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वाशिम तालुक्यासह रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट गडद होत असल्याने, प्रस्तावित उपाययोजनांची आतापासूनच प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनातर्फे चाचपणी सुरू आहे. टँकरचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून प्राप्त नसल्याने, सध्या जिल्ह्यातील एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जिल्ह्यातील २२ गावांमध्ये एप्रिल ते मे या महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, प्राप्त प्रस्तावानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा, खैरखेडा, रिसोड तालुक्यातील करंजी, कवठा, भर जहाँगीर परिसर, वाशिम तालुक्यातील काटा, तामसाळा आदी परिसरातही पाणीटंचाईची तिव्रता अधिक असते. यंदाही या परिसरात पाणीटंचाईचे संकट घोंघावत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा गावकरी बाळगून आहेत. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी २८३ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहीर अधिग्रहण केल्यानंतर, अनेक ठिकाणी ‘विहीर अधिग्रहण’ असा फलकही संबंधित विहीर परिसरात लावण्यात येत नाही. त्यामुळे कोणत्या विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले, याची माहिती संबंधित गावातील नागरिकांना मिळत नाही. 

पाणीटंचाई आराखडा मंजूर
जिल्ह्यातील ३९२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. पाणीटंचाईची तीव्रता असलेल्या गावांमध्ये प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. ४२२ उपाययोजनांवर चार कोटी ९० लाख १७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.


सद्यस्थितीत एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा नाही
जिल्ह्यातील २२ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत एकाही ठिकाणावरून टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. प्राप्त प्रस्तावानुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.


विहिरी अधिग्रहणासाठी चाचपणी
पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील २८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत प्रशासनातर्फे चाचपणी केली जात आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करू शकेल, अशा विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहीर अधिग्रहण केल्यानंतर संबंधित विहिरीतून वैयक्तिकरीत्या पाणी घेण्यास मनाई केली जाणार असून, या विहिरीतील पाणी गावकऱ्यांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.

Web Title: Crisis of water scarcity in 392 villages in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.