धुळीमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:02+5:302021-02-17T04:49:02+5:30
निवेदनानुसार, सावरगाव बरडे येथे सुरू असलेल्या एका खासगी कंपनीच्या सिमेंट मिक्सर प्लांटमधून उडणारी धूळ आणि डस्टमुळे गट नंबर ४२ ...
निवेदनानुसार, सावरगाव बरडे येथे सुरू असलेल्या एका खासगी कंपनीच्या सिमेंट मिक्सर प्लांटमधून उडणारी धूळ आणि डस्टमुळे गट नंबर ४२ मधील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून विहिरीतील पाणीही दूषित झाले आहे. यासंदर्भात ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या प्रकरणाची सात दिवसांत कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प संचालकांना दिला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदारांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व नुकसानीचा अहवाल देण्याबाबत ५ फेब्रुवारी रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानंतर कृषी कार्यालयाकडून अजूनही शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानाचा अहवाल दिला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणाची येत्या सात दिवसांत चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी लोडू कंकाळ, प्रभू कंकाळ व बालू कंकाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.