राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धुळीमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:55 PM2018-11-25T14:55:02+5:302018-11-25T14:55:27+5:30
वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत.
दुचाकीधारकही त्रस्त: मातीमिश्रीत मुरुमाच्या वापराचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात असलेल्या रस्ता कामांमुळे पिकांचे नुकसान होत आहे. वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत.
जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-हिंगोली , वाशिम-यवतमाळ, महान आर्णी आणि मालेगाव-मेहकर या चार मार्गाचे काम करण्यात येत आहेत. सिमेंट काँक्रीटचे हे रस्ते चौपदरी करण्यात येत असून, या मार्गाचे कंत्राट परराज्यातील बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी प्राथमिक स्तरावर मुरूम या गौणखनिजाचा वापर करून समतलीकरण करण्यात येत आहे. तथापि, वापरण्यात येत असलेल्या या मुरुमात मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ही माती वाहनांच्या वर्दळीमुळे उडून पिकांवर बसत आहे. यामुळे पाने धुळीने माखली जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. पाने हे झाडांसाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम करतात; परंतु त्यावर धुळ बसत असल्याने पिके सुकत चालली आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांची पेरणी झालेली असली तरी, वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील शेतांत खरीपातील तुरीचे प्रमाणच अधिक असल्याने सर्वाधिक फटका याच पिकाला बसत आहे. दरम्यान, वाहनांमुळे उडणारी धुळ डोळ्यात जात असल्याने दुचाकीचालकांनाही याचा त्रास होत आहे.