अतिथंडीमुळे पिकांचे नुकसान; पंचनाम्यासंदर्भात मागविले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 02:52 PM2019-01-21T14:52:44+5:302019-01-21T14:53:10+5:30
वाशिम : डिसेंबर २०१८ या महिन्यात अतिथंडीमुळे हळद, हरभरा यासह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डिसेंबर २०१८ या महिन्यात अतिथंडीमुळे हळद, हरभरा यासह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे. यासंदर्भात भाजपा पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन दिले होते.
२५ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान तापमानाचा पारा ८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हळद, मका, हरभरा यासह मिरची, कोबी, पालक, मेथी आदी भाजीपालावर्गीय पिकांना जबर फटका बसला आहे. रिसोड तालुक्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील हळद व मक्याची झाडे करपली असून, अन्य तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील एकलासपूर, वाकद, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मुंगळा यासह मानोरा, कारंजा, वाशिम तालुक्यातही हळद, मका यासह भाजीपालावर्गीय पिकांना कडाक्याच्या थंडीचा फटका बसला होता. हळद, हरभरा, मका, कोबी, मेथी व अन्य भाजीपालावर्गीय गटातील बहुतांश पिके करपून गेल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले. नुकसानग्रस्त पिकांचे स्थळ निरीक्षण तसेच पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्याकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने १८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविले असून, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्याचे आदेश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन येताच, जिल्ह्यात पुढील कार्यवाही केली जाणार आहे.